

पुणे: विशिष्ट समाजव्यवस्था आणि धार्मिकतेचा प्रचार करणाऱ्या कला आणि साहित्य यामुळे समाजामध्ये दुफळी निर्माण होते. समानतेचा विचार मांडून समाजामध्ये एकता, बंधुता निर्माण व्हावी, यासाठी समानतेचा विचार मांडणाऱ्या दलित साहित्य आणि कलेची समाजाला नितांत गरज आहे.
महाराष्ट्रात उदय झालेल्या दलित साहित्याची चळवळ व्यापक झाली असून, देशभरातील १८ राज्यांमध्ये दलित साहित्याचा आवाका वाढला आहे. त्याचे अनुकरण करीत दलित कलेची चळवळ पुढे जावी,' अशी अपेक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डाॅ. सुखदेव थोरात यांनी मंगळवारी व्यक्त केली.
करुणादीप फाउंडेशन आणि त्रिरत्न वैरोचना सेंटरच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या उर्गेन आर्ट फेस्टिवलचे उद्घाटनावेळी डॉ. थोरात बोलत होते. या वेळी ज्येष्ठ चित्रकार सवी सावरकर, माजी पोलिस अधिकारी चंद्रशेखर दैठणकर, ज्येष्ठ पत्रकार-लेखक राजू परुळेकर, फाउंडेशनचे प्रमुख डॉ. जीवक गायकवाड, डॉ .अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते.
डॉ. थोरात म्हणाले , 'साहित्याप्रमाणे चित्र, शिल्प, नाटक, चित्रपट अशा प्रयोगक्षम कला समाजाचे प्रबोधन करून समतेची भाषा बोलतात. त्यामधूनही समाजपरिवर्तन घडू शकते. परिवर्तनाच्या चळवळीला आणखी बळकटी देण्यासाठी साहित्य आणि कला हे महत्त्वाचे माध्यम आहे.