

राजगुरुनगर: खेड तालुक्यातील मरकळ येथे ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यावरून ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटनेने अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा तसेच आरोपीला अटक करण्याची मागणी केली.संघटनेच्या वतीने तहसीलदार प्रशांत बेडसे यांना मंगळवारी (दि ६) निवेदन देण्यात आले असून त्यात काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामपंचायत कार्यालय, मरकळ, ता. खेड, मध्ये सोमवारी (दि ५) ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब जाधव कर्तव्यावर होते.शासकीय नियमांनुसार नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे व इतर तातडीचे कामकाज करत असताना प्रशांत देविदास लोखंडे नावाच्या व्यक्तीने जाधव यांच्या कामात अडथळा आणून त्यांना अत्यंत निर्घृणपणे मारहाण केली.
या हल्ल्यात जाधव यांना गंभीर दुखापत झाली आहे. यावरून संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, शासकीय कर्मचाऱ्यावर भरदिवसा व कर्तव्यावर असताना झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय, बेकायदेशीर असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे.
ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटनेने तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन दिले असून त्यात शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यास गंभीर दुखापत पोहोचवणाऱ्या प्रशांत देविदास लोखंडे यांच्यावर तात्काळ अजामीनपात्र (नॉन-बेलेबल) स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा.
आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी या मागण्यांचा उल्लेख केला आहे. जोपर्यंत आरोपीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊन त्याला प्रत्यक्ष अटक होत नाही, तोपर्यंत संघटनेचे सर्व सदस्य आंदोलनाचा मार्ग अवलंबतील असेही नमूद केले आहे.