

खडकवासला: वडगाव बुद्रुक परिसरात मुठा कालव्यालगत पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात बांधकामाचा राडारोडा टाकण्यात आला आहे. परिसरात राडारोड्याचे मोठे ढिग लागल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन्ही कालव्यांमधील जागेत वाढत असलेल्या या भरावामुळे कालव्याच्या देखभाल-दुरुस्तीबरोबरच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कालव्यालगत राडारोडा टाकण्यासाठी डंपरचा वापर केला जात आहे. विशेषतः दोन्ही कालव्यांमधील जागेत मोठ्या प्रमाणात राडारोडा साचल्याने भविष्यात कालव्याच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, कालव्यालगतचा भराव वाढत राहिल्यास पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह, कालव्याची संरचना आणि देखभाल यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात असताना संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. राडारोड्याचे ढिग एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की, हा परिसर कालव्यालगतचा आहे की, राडारोडा टाकण्याची जागा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात कालव्याला धोका निर्माण झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महापालिका, पाटबंधारे विभागाने पाहणी करावी
दरम्यान, या परिसरात महापालिकेचा कचरा प्रकल्पही सुरू आहे. त्यामुळे संबंधित जागा नेमकी कोणाच्या ताब्यात आहे, याची स्पष्टता करून महापालिका व पाटबंधारे विभागाने संयुक्त पाहणी करावी आणि राडारोडा कोणी आणून टाकला, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी केली आहे.
कालव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. राडारोडा हटवून तो टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
पल्लवी चाकणकर, अध्यक्षा, आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान
या जागेची पाहणी करून राडारोडा टाकणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. महापालिकेकडून सुरू असलेल्या कचरा प्रकल्पाबाबतही अहवाल मागविण्यात येईल
सचिन गाडे, उपअभियंता, मुठा कालवा पाटबंधारे विभाग