

पुणे: मराठी साहित्यातील अक्षरगंध आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही; तो थेट सातासमुद्रापार दरवळताना दिसत आहे. परदेशात स्थायिक झालेल्या मराठीभाषकांच्या हृदयात ‘आपल्या भाषेची ओढ’ अधिक घट्ट होत असून, त्यातूनच परदेशात स्थायिक झालेल्या मराठीभाषकांकडून छापील पुस्तकांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून, पुण्यासह राज्यातील विविध भागांतून पुस्तके थेट अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांमध्ये कुरिअर, टपालाद्वारे पाठवली जात आहेत. मराठी साहित्याचा ‘रिजनल ते ग्लोबल’ असा प्रभावी प्रवास वेगाने सुरू आहे.
ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्सच्या डिजिटल युगातही छापील पुस्तकांची मोहिनी अजूनही कायम असल्याचे दै. ‘पुढारी’ने गुरुवारी (दि. 23) साजऱ्या होणाऱ्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त घेतलेल्या आढाव्यात समोर आले.
पुण्यातील प्रकाशकांनी आणि पुस्तक दालनांनी या वाढत्या मागणीचा वेध घेत थेट परदेशात पुस्तक पाठविण्याची सुविधा सुरू केली आहे. ऑनलाइन ऑर्डर घेऊन कुरिअर, टपाल आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दरमहा 30 ते 50 पुस्तके परदेशात पाठवली जात आहेत. विशेष म्हणजे, दिवाळी अंकांना परदेशातही मागणी वाढली आहे.
अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर म्हणाले की, विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी भाषकांना मराठी पुस्तके फारशी उपलब्ध होत नाहीत; म्हणूनच अमेरिका, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, इंग्लंड अशा विविध देशांमध्ये मराठी पुस्तके पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुस्तके कुरिअर, टपालाद्वारे पाठवली जात आहेत.
मराठी पुस्तकांची मागणी वाढली आहे. वर्षभरात आम्ही 400 हून अधिक पुस्तके विविध देशांत पाठवतो. हा प्रवास केवळ सांस्कृतिक दुवा नसून, मराठी साहित्याच्या जागतिक विस्ताराचे नवे पाऊल आहे.
घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन