मेडिको लीगल प्रकरणांसाठी नियमावली : डॉ. चंद्रकांत म्हस्के

मेडिको लीगल प्रकरणांसाठी नियमावली : डॉ. चंद्रकांत म्हस्के

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रक्तनमुना अदलाबदल प्रकरणानंतर चौकशी समितीने ससूनमध्ये मेडिको लीगल केस गांभीर्याने हाताळले जात नसल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर मेडिको लीगल प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात येणार असल्याची माहिती ससूनचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली. ससूनमध्ये पारदर्शक कारभारासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यावर ससून रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा अतिरिक्त कार्यभार बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

डॉ. म्हस्के यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला, त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'ससून रुग्णालयात हजारो रुग्ण उपचारांसाठी येतात. रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यावर भर देण्याचा मानस आहे. बी. जे. महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. महाविद्यालयाला संशोधनाची परंपरा लाभली आहे. त्याला चालना देण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील.' डॉ. चंद्रकांत म्हस्के बी. जे. शासकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी 1981 मध्ये वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यांनी 2005 ते 2016 या काळात त्वचाविज्ञान (डर्मेटोलॉजी) विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news