सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत घेतले बिल्डरपुत्राच्या रक्ताचे नमुने!

सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत घेतले बिल्डरपुत्राच्या रक्ताचे नमुने!
पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर परिसरात भरधाव वेगात पोर्शे कार चालवून तरुण-तरुणीचा जीव घेणार्‍या अल्पवयीन बिल्डरपुत्राला घटनेनंतर ससून सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले. या वेळी सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर अल्पवयीनाच्या शरीरातून काढण्यात आलेल्या रक्ताचे इंजेक्शन कचराकुंडीत फेकून न देता तिर्‍हाईत व्यक्तीकडे सोपविण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी (दि. 30) न्यायालयाला दिली.
ससून सर्वोपचार रुग्णालयात ज्या ठिकाणी रक्ताचे नमुने घेतले, त्या ठिकाणचा पंचनामा देखील करण्यात आला.
परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता यामध्ये डॉ. श्रीरही हळनोर आणि घटकांबळे यांच्यासह काही साक्षीदार सीसीटीव्ही फुटेजमध्ये  दिसून येत आहेत. डॉ. तावरे, डॉ. हळनोर आणि घटकांबळे यांच्यामध्ये अल्पवयीन मुलाच्या रक्त घेण्यावेळी विविध माध्यमांतून संवाद झालेला आहे. तसा सीडीआर देखील जप्त करण्यात आला आहे. याखेरीज अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्याऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याचे या प्रकरणात उघडकीस आल्याची माहितीही अतिरिक्त सरकारी वकील नितीन कोंघे यांनी न्यायालयाला दिली.

तिघांच्या कोठडीत सात दिवसांची वाढ

अल्पवयीन मोटारचालकास वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने 5 जूनपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्यात कलमवाढ देखील करण्यात आली आहे.

संशयितांना अटक होणार

कल्याणीनगरमधील गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत अनेकांचे सीडीआर तपासले आहेत. त्यातील काही संशयित आरोपींची नावे निष्पन्न झालेली आहेत. त्यांच्याविरोधात सक्षम पुरावे मिळाल्यानंतर आम्ही त्यांना अटक करणार आहोत, अशी माहिती तांबे यांनी न्यायालयात दिली.

आरोपींच्या अनुषंगाने तांत्रिक तपास पूर्ण

रिमांडमध्ये देण्यात आलेल्या मुद्द्यांचा तपास यापूर्वीच झालेला आहे. तसेच, सर्व आरोपी त्यांच्या ताब्यात होते. त्यामुळे पोलिस एकत्रित तपास करू शकले असते. कोठडी कालावधीत त्यांना आरोपींच्या हस्ताक्षरांचे नमुने घेणे आवश्यक होते. तसेच आरोपींच्या अनुषंगाने तांत्रिक तपास झालेला आहे, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. ऋषिकेश गानू, अ‍ॅड. विपुल दुशिंग आणि अ‍ॅड. पुष्कर दुर्गे यांनी युक्तिवाद केला.

भ्रष्टाचार अधिनियमातील कलम लागू

आरोपींविरोधात दाखल गुन्ह्यात भ्रष्टाचार अधिनियमाच्या कलम 7 आणि 7 (अ) या कलमांची वाढ करण्यात आली आहे. लोकसेवकाने शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी केली तर त्यावर या कलमांनुसार गुन्हा दाखल होतो. सहा महिने ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड, अशी शिक्षा गुन्हा सिद्ध झाल्यास सुनावण्यात येते.

रक्ताचे नमुने बदलल्याची खंत

गुन्ह्यात मी रक्ताचे नमुने बदलले होते. त्याची माहिती मलाही होती. मी केलेल्या गोष्टीची मला खंत असून, त्यामुळे मला दोन दिवस झोप लागली नसल्याची भावना डॉ. हळनोर याने पोलिसांसमोर व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तपासणीसाठी पाठविलेले रक्त महिलेचे

रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीसाठी रक्त काढतेवेळी अल्पवयीन मुलाऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले. दरम्यान, ज्या महिलेचे रक्त तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, तिचा शोध अद्याप लागलेला नाही. आम्ही या महिलेचा शोध घेत  असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयास दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news