’ते’ रक्त बिल्डरपुत्राच्या आईचे नाही; आईने रक्त दिल्याची होती चर्चा

’ते’ रक्त बिल्डरपुत्राच्या आईचे नाही; आईने रक्त दिल्याची होती चर्चा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसर्‍या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात मुलाच्या आईनेच रक्त दिल्याची चर्चा रंगली असताना रक्ताच्या नमुन्याचा प्राप्त झालेला अहवाल व नमुन्यासाठी दिलेले रक्त अल्पवयीन मुलाच्या आईचे नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिली आहे. कारण, पोलिसांनी गुपचुपपणे काढलेल्या रक्ताच्या डीएनएशी आईच्या रक्ताचे नमुने जुळले असते. परंतु, पोलिसांच्या तपासात ते नमुने जुळले नसल्याचे यापूर्वीच पोलिसांनी सांगितले होते, असेही आता स्पष्ट झाले आहे.

दाखल गुन्ह्यानुसार दि. 20 मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन त्याच्याकडील पोर्शे कारने दुचाकीवर जाणार्‍या तरुण-तरुणीला उडविले होते. या जोरदार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर समाज माध्यमांवर पोलिसांवर तसेच अन्य यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. याप्रकरणी मुलाच्या वडिलासह त्याच्या आजोबाला देखील अटक झाली होती. त्याला मद्य पुरविणार्‍या पबचालकासह मॅनेजरला देखील अटक झाली होती. या प्रकरणात येरवडा पोलिसांनी दिरंगाई केल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर व पोलिस कंट्रोल रूमला माहिती न कळविल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले होते.

या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस आयुक्तालयात येऊन प्रकरणाची माहिती घेतली होती. पुढे तपासात मुलाच्या रक्ताचे सकाळी घेण्यात आलेले नमुनेच बदलण्यात आले होते. हे नमुने बदलण्यामध्ये मुलाच्या वडिलाचा सहभाग होता. मुलाच्या वडिलाला अटक झाल्यानंतर त्याच्या देखील रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. पोलिसांनी घटनेच्या सायंकाळी अठरा तासांनंतर मुलाचे गुपचुप रक्त घेतले होते. अपघाताच्या दिवशी सकाळी घेतलेले रक्त व मुलाच्या वडिलाच्या रक्ताच्या नमुन्यांचा डीएनए जुळला नाही. मात्र, सायंकाळी घेतलेल्या रक्ताचे नमुने आणि मुलाच्या वडिलाच्या रक्ताचे नमुने जुळले.

जर सकाळचे घेतलेले रक्त आईचे होते, तर सायंकाळी अल्पवयीन मुलाच्या घेण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्याशी डीएनए का जुळला नाही? एकीकडे वडिलाच्या डीएनएशी घटनेच्या दिवशी सायंकाळी मुलाचे घेतलेले नमुने जुळले, असे बोलले जात असताना मग सकाळी आईच्या रक्ताचे नमुने घेतले असतील, तर त्याचा डीएनए वडिलाच्या डीएनएशी किंवा सायंकाळी मुलाच्या डीएनएशी जुळला नाही, यावरून ते रक्त आईचे नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news