सुवर्णा चव्हाण :
पुणे : दर वर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात ठिकठिकाणी जाऊन महिलांचे ग्रुप मंगळागौरचे कार्यक्रम सादर करणार असून, महिनाभरापूर्वीच या कार्यक्रमांच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. कार्यक्रमांच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि महिला-युवतींनी सरावालाही सुरुवात केली आहे. अधिक मासाच्या श्रावणानंतर 17 ऑगस्टपासून सुरू होणार्या श्रावणात मंगळागौरचे कार्यक्रम रंगणार आहेत. मंगळागौरच्या प्रशिक्षण वर्गालाही सुरुवात झाली आणि त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. झिम्मा, फुगडी, गोफ, तळ्यात-मळ्यात, असे विविध मंगळागौरच्या खेळांचे प्रशिक्षण महिला-युवतींना दिले जात असून, प्रशिक्षण घेऊन या महिला-युवतीही खेळ सादर करणार आहेत.
मंगळवारपासून अधिक श्रावण मासाला सुरुवात झाली असून, या मासात फारसे धार्मिक विधी-कार्यक्रम होणार नसले तरी त्यानंतरचा श्रावण हा धार्मिक कार्यक्रमांचा असणार आहे. त्यामुळेच त्यासाठी महिला-युवतींनी खास तयारी केली असून, मंगळागौरचे ग्रुपही सादरीकरण करण्यासाठी सज्ज आहेत. श्रावण महिन्यातील मंगळागौरच्या कार्यक्रमांसाठी अॅडव्हान्स बिकिंग झाले आहे. प्रत्येक ग्रुपच्या तीन ते चार कार्यक्रमांसाठी बुकिंग झाले आहे आणि सध्या ठिकठिकाणी ग्रुपचा सराव सुरू आहे. त्याशिवाय मंगळागौर खेळ सादर करणार्या काही महिलांकडून प्रशिक्षण वर्गही घेतले जात आहेत.
याविषयी पल्लवी धांदरफळे म्हणाल्या की, सध्या मंगळागौरच्या कार्यक्रमांसाठी अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून, आमच्या गटातील महिलांनी सरावालाही सुरुवात केली आहे. आम्ही महिला-युवतींसाठी प्रशिक्षण वर्गही घेत आहोत. हे वर्ग ऑनलाइन-ऑफलाइन पद्धतीने घेत आहोत. तरुण मुलींसह ज्येष्ठ महिलाही वर्गांना येत आहेत. 40 ते 50 खेळांचे प्रकार त्यांना शिकवत आहोत. त्याही प्रशिक्षण घेऊन मंगळागौरचे खेळ सादर करण्यासाठी तयारी करीत आहेत.
खेळांच्या विविध प्रकारांसह गाणी
मंगळागौरचे खेळ सादर करणार्या एका ग्रुपमध्ये 10 ते 15 महिलांचा समावेश असतो. या ग्रुप्सना कार्यक्रमांसाठी 5 ते 15 हजार रुपयांचे मानधन मिळते. झिम्मा, फुगड्यांचे विविध प्रकार, गोफ, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, अशा वेगवेगळ्या खेळांच्या प्रकारांसह गाणी सादर केली जातात.
कार्यक्रमांसाठी बुकिंगला सुरुवात झाली असून, आमच्या ग्रुपमधील 8 महिला सध्या सराव करीत आहेत. प्रत्येकीने तयारीला सुरुवात केली आहे. आम्ही 110 खेळ सादर करतो. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी कार्यक्रम सादर करण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत.
– सुवर्णा काळे, सदस्या, मंगल ग्रुप
हे ही वाचा :