

पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी हे बहुभाषिक असायला हवे. त्यांना इंग्रजीबरोबर जास्तीत जास्त परकीय भाषा याव्यात, यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाचा हा उपक्रम पाहून फ्रेंच दूतावासाकडून मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रेंच दूतावासाकडून शंभर शिक्षकांना प्रशिक्षण देणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश सारख्या भाषा विद्यार्थ्यांना शिकवल्या जात आहेत. यामधील बहुतांश शिक्षकांनी स्वतःहून भाषा शिकल्या आहेत. त्यानंतर चालू वर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने सहकार्याने शिक्षकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परकीय भाषा विभागाच्या माध्यमातून काही शिक्षक परकीय भाषेचे धडे गिरवत आहेत. त्यामध्ये 30 शिक्षक हे फ्रेंच भाषा शिकत आहेत.
जिल्हा परिषदेचा या उपक्रमाबद्दल माहिती मिळाल्यानंतर मुंबईमधील फ्रेंच दूतावासातील अधिकारी सोफी हेनक्विंट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परकीय भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती आचार्य आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत फ्रेंच दूतावास, विद्यापीठ आणि पुणे जिल्हा परिषद यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्याचे ठरले आहे.
फ्रेंच दुतावासा सोबत झालेला करार हा भाषा शिक्षणाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांना जागतिक पटलावर घेऊन जाण्यासाठी दूरदृष्टीचा उपक्रम ठरणार आहे. पुढील काळात शंभर शिक्षकांना फ्रेंच दूतावासाच्या माध्यमातून फ्रेंच भाषेचे धडे देण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. फेंच भाषा आणि संस्कृतीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळांपर्यंत पोहोचल्यास ग्रामीण मुलांचे शैक्षणिक दृष्टीकोन बदलण्याबरोबरच भविष्यातील रोजगार संधी, परदेशी शिक्षणाचे मार्ग आणि जागतिक संवाद कौशल्ये त्यांच्या आवाक्यात येणार आहेत.
गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे