

पुणे: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेतला आहे. शासकीय सेवेतील विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षांमध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आता एक वर्षाची विशेष शिथिलता देण्यात आली आहे.
राज्य शासनाकडून आरक्षणाच्या विविध तरतुदींनुसार सुधारित मागणीपत्रे प्राप्त झाल्यानंतर आयोगाने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार, ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपली होती, त्यांना 'एक वेळची विशेष बाब' म्हणून परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
हा निर्णय प्रामुख्याने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ या परीक्षांसाठी लागू असणार आहे. या निर्णयामुळे आता पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ६ जानेवारीपर्यंत आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावर दाखल करू शकतात. वयोमर्यादेतील ही सवलत केवळ या विशिष्ट परीक्षेसाठी आणि एकवेळची सवलत म्हणून लागू करण्यात आली आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.