

पुणे: नवीन वर्षात मार्च अखेरपर्यंत ताफ्यात नव्या बस दाखल करण्याचे पीएमपी प्रशासनाने नियोजन आहे. नवीन वर्ष 2026 मध्ये पीएमपीच्या बसची एकूण संख्या 4 हजारांवर नेण्याचे लक्ष्य पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी ठेवले आहे. या विस्तारासोबतच पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न 4 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धारही त्यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीच्या सेवेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि पुणेकरांना पुरेशा बस उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार शहराच्या लोकसंख्येसाठी आवश्यक असलेली बससंख्या सध्या पीएमपीच्या ताफ्यात उपलब्ध नाही. त्यामुळे शहरात खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. परिणामी, शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. हे कमी करण्यासाठी आणि पुणेकरांना आवश्यक असलेल्या बसचा पुरवठा करण्यासाठी पीएमपी अध्यक्ष देवरे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए भागातील लोकसंख्येसाठी पहिल्या टप्प्यात 4 हजार बस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या टप्प्यात आणखी बस आणण्याचाही त्यांचा विचार आहे. आणि पहिल्या टप्प्यातील या चार हजार बस नवीन वर्षात सन 2026 मधील मार्च अखेरच्या आतच आणण्याचे नियोजन सुरू असल्याचे देवरे यांनी सांगितले.
उत्पन्न वाढविण्याचे लक्ष्य
फक्त बस वाढवणे नव्हे, तर पीएमपीला आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनवण्याकडेही लक्ष केंद्रित केले आहे. सध्याचे उत्पन्न वाढवून ते दररोज 4 कोटींच्या घरात नेण्यासाठी विविध उत्पन्न स्त्रोतांवर काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
मसीएनजी, इलेट्रिक बस वाढवणार...
शहराचा वाढता विस्तार आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, सध्या असलेली बस संख्या अपुरी पडत आहे, हे चित्र बदलण्यासाठी मार्च 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने नवीन बस ताफ्यात सामील केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सीएनजी आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसचा समावेश असेल. बसची संख्या वाढल्यामुळे मार्गावरील बसची वारंवारता वाढेल आणि प्रवाशांचे वेटिंग कमी होण्यास मोठी मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.
मेट्रोकडे फीडर सेवेसाठी पाचशे बसची मागणी
पीएमपी आणि मेट्रो या एकमेकांना पूरक अशा सेवा आहेत. त्यामुळे मेट्रो प्रवाशांना फीडरसेवा उपलब्ध करून देणे आमची जबाबदारी आहे. मात्र, सध्या आमच्याकडे बसची कमतरता आहे. यामुळे मेट्रो प्रवाशांना फीडरसेवा पुरवताना अडचणी येत आहेत. मात्र, मेट्रो प्रशासनाने आम्हाला याकरिता मदत करावी, आणि पाचशे नव्या बस उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचा प्रस्ताव आम्ही मेट्रो प्रशासनाला दिला आहे. त्यावर सकारात्मक चर्चा सुरू असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असे पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे यांनी सांगितले.
पुणेकरांना वेळेवर आणि दर्जेदार बस सेवा देणे, हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही मार्चअखेर 2026 पर्यंत जास्तीत जास्त बस ताफ्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 4 हजार बसचे लक्ष्य पूर्ण झाल्यास शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा ताण कमी होईल आणि उत्पन्नातही वाढ करण्याचे आमचे लक्ष आहे, उत्पन्नात वाढ झाल्यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरवता येतील.
पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल