शिवनगर : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी राजीनामा दिल्याने कारखान्याचा नवा कारभारी कोण याचा निर्णय शनिवारी (दि.23) होणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी सभासदांसह, बारामती तालुका, जिल्ह्याचे लक्ष कोणाची लॉटरी लागते,उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात याकडे लागले आहे. अॅड.केशवराव जगताप,मदननाना देवकाते,सुरेश खलाटे,योगेश जगताप हे संचालक अध्यक्षपदासाठी तीव्र इच्छुक आहेत. कारखान्याची निवडणूक दीड वर्षावर येऊन ठेपल्याने अजित पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या चारही उमेदवारांच्या शेकडो समर्थकांनी मुंबईला जाऊन अजित पवार यांच्याकडे आमचाच उमेदवार कसा सक्षम आहे हे पटवून देत त्यांनाच संधी मिळाली पाहिजे, असे साकडे घातले आहे.
संबंधित बातम्या :
अजित पवार हे शुक्रवारी (दि.22) बारामतीमध्ये येणार असून, त्या वेळी माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाबरोबर बैठक घेऊन अध्यक्षपदाबाबत 'वन-टू-वन' चर्चा करणार असल्याचे समजते. अध्यक्षपदासाठी पणदरे गटातून सिद्धेश्वर सहकार संकुलाचे सर्वेसर्वा आणि सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले अॅड. केशवराव जगताप यांनी मोठी ताकद लावली आहे. जिल्हा परिषद सदस्य या माध्यमातून केलेले काम व सहकारातील दांडगा अनुभव आणि ज्येष्ठत्व या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. निरावागज गटातून मदननाना देवकाते हे उत्सुक असून, गावचे सरपंच ते साखर कारखाना संचालक,उपाध्यक्ष,जिल्हा परिषदेचे सदस्य,जिल्हा बँकेचे संचालक असा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
सांगवी गटातील सुरेश खलाटे तथा लाला मामा हेदेखील अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. जनसामान्यांचा दांडगा संपर्क आणि 13 वर्षांचा संचालकपदाचा अनुभव आणि माणसातील माणूस अशी ओळख त्यांनी निर्माण केल्याने त्यांच्या उमेदवारीकडेदेखील प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात आहे. योगेश जगताप यांनी बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि त्या वेळी केलेले काम,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली एकनिष्ठता,पक्षाचे राज्याच्या युवकांचे उपाध्यक्ष म्हणून केलेली कामे तसेच सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर आणि युवकांमधील 'क्रेझ' या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
अजित पवारांचे धक्कातंत्र !
उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्थानिक पातळीवरील पदांचे निर्णय घेताना धक्कातंत्रासाठी प्रसिध्द आहेत. माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबतही ते असा निर्णय घेऊ शकतात, जरी चार उमेदवार प्रबळ दावेदारी व्यक्त करत असले, तरी या व्यतिरिक्त 'जैसे थे' किंवा काही वेगळेच नाव अध्यक्षपदासाठी पुढे येऊ शकते अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.