

Maharashtra Weather Updates
महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण वगळता पुढील ४ दिवस राज्यातील उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढल्याने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच पावसामुळे खरीप पेरणी, शेतीच्या मशागतीचे कामे थांबली आहेत.
२९ मे पासून १२ जून दरम्यानच्या २ आठवडे कालावधीत कोकण वगळता राज्यातील अंतर्गत भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेतीशी संबंधित राहिलेली कामे पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. १२ जूनपासून राज्यात मान्सून परत येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे येथील भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात १ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला १ ते २ जून दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागात पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील, असे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.
दरम्यान, दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
मान्सूनने गुरुवारी (दि २९ मे) छत्तीसगड आणि ओडिशाचा काही भाग, उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग, ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भाग आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालचा काही भाग आणि संपूर्ण सिक्कीम व्यापला.