

Weather Impact on Farming Kolhapur Agriculture
विशाळगड: “आभाळी घन दाटले, आसवांचे पूर लोटले, बळीराजाच्या नशिबी, आता जगायचं कसं?" अशा वेदनादायी शब्दांत सध्याचा शेतकरी आपली व्यथा मांडत आहे. मृग नक्षत्रापूर्वीच आलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. "बीज पेरले नाही मातीत, तरी चिंतेचा पाऊस पडे मनात," अशी सध्याच्या बळीराजाची अवस्था झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने शेतात पाणी साचले असून, रोहिणी नक्षत्रातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत.
शेती मशागतीची कामे ठप्प झाल्याने धुळवाफ पेरणी लांबणीवर पडली आहे. भाताचे तरवे घालणेही अशक्य झाले आहे. पेरणी योग्य वातावरण नसल्यामुळे शेतात पाणी आणि चिखल साचला आहे आणि पेरणीचा हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी कर्ज घेतले असून, बिघडलेल्या वेळापत्रकामुळे मोठे आर्थिक संकट त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.
या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पीक पद्धतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मका, सूर्यफूल यांसारखी पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. कृषी तज्ज्ञांनी पावसाने उघडीप दिल्यावरच योग्य मशागत करून पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. या परिस्थितीत शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. निसर्गाच्या लहरीपणासमोर हतबल झालेल्या बळीराजासमोर सध्या "आता जगायचं कसं?" हाच मोठा प्रश्न आहे.