

विश्वास निकम
Farmer Crop loss Raigad
कोलाड : अवकाळी मोसमी पावसासह वादळी वार्यामुळे रायगड जिल्ह्यातील उन्हाळी भातशेतीला मोठा फटका बसला आहे. भात तयार होऊन कापणीच्या स्थितीत असताना मुसळधार पाऊस आणि वादळी वार्यामुळे उभे भातपीक भूईसपाट होऊ पाण्यात भिजले आहे. आता भिजलेल्या भाताच्या लोंब्यांना कोंब आले असून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील माणगाव, रोहा, कर्जत आणि पेण तालुक्यात उन्हाळी भात पिक घेतले जाते.
रोहा तालुक्यातील कोलाड, खांब परिसरात पावसाची संततधार सुरु असून यामुळे या परिसरातील भातशेतीचे प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पावसामुळे आडवी झालेल्या भाताला मोड आले आहेत. यामुळे बळीराज्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. तर नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते.
तालुक्यातील कोलाड पाटबंधारे खात्यातून सोडण्यात येणार्या पाण्याच्या माध्यमातून पुई, पुगांव, मूठवली, शिरवली, खांब परिसरात उन्हाळी भात शेती केली जाते. मोठया मेहनतीने भातशेतीची लागवड केली गेली. भातपिकेही उत्तम प्रकारे आली. परंतु भात कापणीच्या वेळी यावर्षी सहा मेपासून अवकाळी पाऊस सुरु झाला. आज पाऊस कमी होईल, उद्या कमी होईल असे करून जवळजवळ 20 दिवस झाले तरी अवकाळी पाऊस थांबला नाही. यामुळे भातकापणीला विलंब झाला व उभी असलेली भातपिके आडवी झाली आहेत. यामुळे या परिसरातील शेकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास क्षणात अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळी भात पिके तयार होतात. शेतकरी वर्ग ही भात पिके मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापून, बांधून, झोडून, पूर्ण करतात. जूनमध्ये पावसाळी पेरणी करतात परंतु 6 मेपासून अवकाळी पाऊस सतत पडण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे या पावसामुळे कोलाड, खांब परिसरातील शेतकर्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
30 हजार रुपये खर्च करून व इतर मेहनत करून भातशेती केली. भातपीक ही उत्तम प्रकारे आले परंतु सतत पडलेल्या पावसामुळे भातपीक जमीनदोस्त होऊन भाताला मोड आले आहेत. यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. तर भातपीक शेतात आडवे झाले असल्यामुळे पावसाळी ही भातपिक घेऊ शकत नाही. यामुळे नुकसान झालेल्या भात पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी.
नथुराम हरि कापसे, शेतकरी, मुठवली, रोहा
रायगड जिल्ह्यातील उन्हाळी भातशेती कापणीसाठी तयार होती. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे या तयार भातशेतीचे नुकसान झाले आहे. भात पाण्यात भिजल्याने त्यास कोेंब आले आहेत. जिल्ह्यातील उन्हाळी भातशेतीच्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.
वंदना शिंदे, कृषी अधीक्षक, रायगड जिल्हा
पेण तालुक्यात उन्हाळी भात पिकाचे क्षेत्र सुमारे दोनशे हेक्टर आहे. तालुक्यात उन्हाळी भातपिकाची चाळीस टक्क्यापर्यंत कापणी झाली होती. मात्र झालेल्या पावसामुळे या उन्हाळी भातशेतीचे नुकसान झाले आहे. सुमारे 50 ते 60 टक्के उन्हाळी भातशेतीचे नुकसान झाले आहे.
सागर वाडकर, कृषी अधिकारी, पेण तालुका