

बारामती: बारामती शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱया जगताप कुटुंबियांचा तिरुपती बालाजीचे दर्शन घेवून परत येत असताना हुबळीनजीक बुधवारी (दि. ३) रोजी पहाटेच्या वेळी अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
या अपघातात अनिल सदाशिव जगताप (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी वैशाली अनिल जगताप (वय ४५) या गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना हुबळी येथील शासकीय रुग्णालयात त्वरीत उपचारासाठी हलविण्यात आले होते.
परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेत जगताप दांपत्याचा मुलगा अथर्व (वय २४) व अक्षता (वय २०) हे ही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याच मोटारीत त्यांच्या एका नातेवाईकाचा मुलगाही होता. सुदैवाने त्याला फारशी इजा झालेली नसल्याची माहिती जगताप कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार जगताप कुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेवून ते परत बारामतीकडे येत होते. बुधवारी पहाटे साडे चारच्या सुमारास हुबळी राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना त्यांच्या पुढे असणाऱया ट्रकने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे त्यांची चारचाकी त्या ट्रकला पाठीमागून धडकली.
यात अनिल जगताप हे जागीच ठार झाले. तर वैशाली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल जगताप हे येथील श्रायबर डायनामिक्स कंपनीमध्ये कार्यरत होते. वैशाली जगताप या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सक्रीय कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच बारामतीत हळहळ व्यक्त केली गेली. गुरुवारी (दि. ४) रोजी या दांपत्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी दिली.