

पुणे : राज्यातील यंदाच्या रब्बी हंगामात सुमारे 65 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांच्या पेरण्या अपेक्षित आहेत. सरासरी क्षेत्रापेक्षा सुमारे 10 लाख हेक्टरने वाढण्याचा अंदाज आहे. बि-बियाने, खते आदी निविष्ठाच्या उपलब्धतेचे नियोजन कृषी विभागाने केले असून हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रयत्न कृषी विभागाकडून सुरु असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दै. "पुढारी "शी बोलताना दिली.(Latest Pune News)
येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत शुक्रवारी (दि. 17) राज्याच्या रब्बी हंगाम नियोजनाच्या बैठकीसाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालक वर्षा लड्डा-उंटवाल यांच्यासह कृषी संचालक, राज्यातील विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
भरणे म्हणाले, राज्यात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. खते आणि बियाण्यांच्या बाबतीमध्ये आम्ही नियोजन केले आहे. युरिया खताची टंचाई जरी असली तरी केंद्र सरकारशी बोलून युरियाचे टंचाई दूर करण्याबाबत निर्णय केला जाईल.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्यावतीने मदत दिली जात आहे. अजूनही पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. हे साधारणतः सात ते आठ जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित जिल्ह्याचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात काम सुरू आहे. केंद्र सरकारला नुकसानीचा अहवाल द्यायचा आहे तो बिनचूक गेला पाहिजे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तो अहवाल केंद्राकडे जाईल. सध्या ही नुकसान भरपाई दोन हेक्टरपर्यंत होती. आता ती आपण तीन हेक्टरपर्यंत देत आहोत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
आतापर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2 हजार 250 कोटी रुपये.दिलेले आहेत. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु असल्याचे भरणे यांनी सांगितले.