पुणे : कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मालवाहतूक इलेक्ट्रिक ट्रकवर येणे गरजेचे आहे. मालवाहतून नुसतीच इलेक्ट्रिक होणार नसून, 2030 पर्यंत ट्रकला मिळणारी 70 टक्के ऊर्जा सौर स्रोतातून आलेली असेल. मुंबई-पुणे इलेक्ट्रीक कॉरिडोअरसारखे अन्य कॉरिडोर उभारण्यासाठीही राज्य सरकार सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले.
चाकण जवळील निघोजे येथील ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार अमित गोरखे, महेश लांडगे, बाबाजी काळे, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, ब्लू एनर्जी मोटर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध भुवलकर, धीरेंद्र शास्त्री बागेश्वरबाबा, प्रशांत रुईया, अंशुमन रुईया, अमित बाजाज, कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, मालवाहतूक करणाऱ्या ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असल्याने सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात इलेक्ट्रीक ट्रकची आवश्यता आहे. ’मेड इन इंडिया’ ट्रकची निर्मिती नुसतीच भारतात नव्हे तर महाराष्ट्रातील पुण्यात झाली आहे. देशाचे ’मेक इन इंडिया’चे स्वप्न त्यानिमित्ताने साकार झाले आहे. या ट्रकच्या बॅटरीसाठी लागणारी 52 टक्के ऊर्जा 2030 पर्यंत सौर ऊर्जा स्रोतातून येईल. तर, 2035 पर्यंत हे प्रमाण 70 टक्क्यावंर जाईल.
इलेक्ट्रीक ट्रकसाठी तयार करण्यात आलेले तंत्रज्ञान भारतीय वातावरणाला अनुरूप आहे. बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानामुळे मालवाहतूक करणाऱ्या ईव्हीला चालना मिळेल. बॅटरीच्या किमती कमी होत असून, बॅटरीच्या कार्यक्षमतेतही वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात बॅटरीच्या सहाय्याने ट्रक 200 ऐवजी 400 किलोमीटरचा पल्ला गाठू शकेल.
ट्रकमध्ये बसवलेल्या सेन्सर आणि स्मार्ट तंत्रज्ञानामुळे क्षमतेपेक्षा अधिक वजन भरले नाही ना याची माहिती मिळेल. त्यामुळे अपघाताला आळा घालण्यास मदत होईल. ब्लू एनर्जीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध भुवलकर म्हणाले, या प्रकल्पात 50 लाख डॉलरची गुंतवणूक केली आहे. येत्या पाच वर्षांत 30 हजार ट्रकचे उत्पादन करण्यात येणार असून, 1200 बॅटरी स्वॅपिंग सुविधा उभारण्यात येतील. वाहतूकीला पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी देशातील पहिला एलएनजी ट्रक सप्टेंबर 2022 मध्ये बनविण्यात आला. इलेक्ट्रिक वाहन हे भविष्य असल्याने ईव्ही ट्रकची निर्मिती करण्यात आली.
दावोस येथील करारावर शिक्कामोर्तब...
दावोस येथे जानेवारी महिन्यात झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत ब्लू एनर्जी कंपनी बरोबर सामंजस्य करार झाला होता. त्या करारानुसार कंपनीने प्रकल्प सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार ट्रक तयार होणार आहेत. तर, 2030 पर्यंत हा आकडा 30 हजारांवर नेण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांनी चालवला ट्रक....
ब्लू एनर्जी मोटर्सने बनविलेला इलेक्ट्रिक ट्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या आवारात चालविला. नवं तंत्रज्ञान समजून घेताना वाहन चालविण्याचा अनुभवही त्यांनी घेतला.