

पुणे: सध्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ठराविक मुदत दिली आहे. परंतु राज्यात आठवडाभरापासून अतिवृष्टी आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकांची कागदपत्रे गोळा करताना दमछाक होत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांचा हा अडसर दूर करून कमीत कमी कागदपत्रांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवावी तसेच कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.
सीईटी सेल, तंत्रशिक्षण संचालनालय, उच्चशिक्षण संचालनालय, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आदींमार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यासाठी विविध कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रे कमी करण्याची गरज विद्यार्थी तसेच पालकांनी व्यक्त केली आहे. तसेच मोजकीच कागदपत्रे घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा. प्रवेश झाल्यानंतर आवश्यकता असेल तर अन्य कागदपत्रांची मागणी करावी. प्रवेशासाठी एक पोर्टल तयार करून या पोर्टलवर दहावीपासूनच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचे रेकॉर्ड तयार करण्यात यावे. या पोर्टलवरील कागदपत्रे आवश्यक त्याठिकाणी संबंधित प्राधिकरणांना उपलब्ध करण्याची सोय करावी.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:
जात प्रमाणपत्र
जात वैधता प्रमाणपत्र
नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
डोमिसाईल प्रमाणपत्र
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र
अपंगत्वाचे प्रमाणपत्र
आधार क्रमांक
बँक खाते
दहावी-बारावीची प्रमाणपत्रे
प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष प्रमाणपत्रे यांसह अन्य कागदपत्रे आवश्यक असतात.
विद्यार्थ्यांना या अडचणींचा करावा लागतो सामना
प्रवेशासाठीची कागदपत्रे गोळा करताना विद्यार्थ्यांची दमछाक होते
कागदपत्रांसाठी सेतुकेंद्रांच्या चकरा माराव्या लागतात
कागदपत्रांसाठी सेतू केंद्रांकडून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट
ठराविक कालावधीतच कागदपत्रे जमा करण्याचे विद्यार्थी-पालकांसमोर मोठे आव्हान
उच्चशिक्षण संस्थांकडून एखादे प्रमाणपत्र नसले तरी अडवणूक होते
कागदपत्रांअभावी प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येते
व्यावसायिक तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कमीत कमी कागदपत्रे विद्यार्थ्यांकडून मागणे गरजेचे आहे. कागदपत्रे गोळा करताना नाहक त्रास होतो. यातून मग कागदपत्रांची संख्या पाहता प्रवेश न घेतलेला परवडला, अशी भावना निर्माण होते. याची संबंधित प्राधिकरणांनी नोंद घेणे गरजेचे आहे.
प्रिया गायकवाड, अभियांत्रिकी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थिनी