Maharashtra School Timing Change: मतदारयादी पुनरीक्षणासाठी शाळांच्या वेळेत बदल; ३० जुलैपर्यंत सकाळच्या सत्रात वर्गांचे निर्देश

बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना दिलासा; मतदारयादी विशेष पुनरीक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षण संचालनालयाचा निर्णय
School
SchoolPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यात मतदारसंघांच्या मतदारयाद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) यशस्वीपणे आणि दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्त शिक्षकांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी शाळेचा वेळात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या ३० जुलैपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.

School
Maharashtra School Bandh: 'शाळा बंद' आंदोलनावर सरकारचा इशारा; शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा एका दिवसाचा पगार कपात

महाराष्ट्र राज्याचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या ३ जुलै २०२६ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने हे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयाद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि दोषविरहित करण्यासाठी तब्बल २४ वर्षांनंतर विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हे काम राष्ट्रीय कर्तव्य असून, भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

School
Pune Landslide Prone Villages: पाटण दरड दुर्घटनेनंतर पुण्यातील ७२ दरडप्रवण गावांचा प्रश्न ऐरणीवर; केवळ २२ गावांतच कामांना सुरुवात

शिक्षकांना शैक्षणिक जबाबदाऱ्या आणि बीएलओ म्हणून दिलेली निवडणूकविषयक जबाबदारी या दोन्ही प्रभावीपणे पार पाडता याव्यात, यासाठी त्यांच्या अध्यापनाचे नियोजन सुलभ करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. शिक्षकांचे तास शक्यतो सलग ठेवून त्यांना उर्वरित वेळेत मतदार पडताळणी आणि पुनरीक्षणाचे काम करता येईल, अशी व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.

School
Pune Water Logging Spots: पुण्यातील ३९ पाणी साचणाऱ्या ठिकाणांसाठी कडक निर्देश; प्रत्येक स्पॉटसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त होणार

याशिवाय, ज्या शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाही, त्यांनी आवश्यकतेनुसार बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना शैक्षणिक तसेच इतर संबंधित कामकाजात सहकार्य करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शाळाप्रमुखांनी अंतर्गत कामाचे नियोजन अशा पद्धतीने करावे, की बीएलओ म्हणून कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण येणार नाही, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

School
SPPU NSS Swachh Wari: ‘स्वच्छ वारी-हरित वारी’ अभियानाला प्रारंभ; पुणे विद्यापीठाच्या एनएसएसची राज्यस्तरीय दिंडी सज्ज

शिक्षण संचालनालयाने सर्व संबंधित शाळांना या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून, करण्यात आलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अनुपालन अहवाल विहित नमुन्यात आणि दिलेल्या मुदतीत शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत बीएलओ म्हणून कार्यरत शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार असून, मतदारयादी पुनरीक्षणाचे काम अधिक परिणामकारकपणे पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news