

पुणे: राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी २१ मे ते २१ जूनपर्यंत संधी देण्यात आली होती. तसेच, २८ जूनला प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. प्रत्यक्षात मात्र गुणवत्ता यादीच जाहीर झाली नाही. तसेच, आयटीआयच्या कॅप प्रवेशाचे वेळापत्रक देखील जाहीर केले नाही. त्यामुळे गुणवत्ता यादीसह वेळापत्रकाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना करावी लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यभरातील १ लाख ५७ हजार ६६४ जागांसाठी यंदा केवळ १ लाख ८९ हजार ७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर १ लाख ६३ हजार ९२३ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण केले. यातील १ लाख ६० हजार ४३३ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले. त्यामुळे यंदा आयटीआयसाठी अपेक्षित अर्जच आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कॅपचे वेळापत्रक जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरवर्षी अकरावी प्रवेश उशिरा आणि आयटीआय प्रवेश प्रक्रिया वेगात सुरू असल्याचे चित्र असते. परंतु, यंदा पहिल्यांदाच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयानाकडून प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित वेग दिला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील ४१८ शासकीय आणि ५८६ खासगी अशा एकूण १ हजार ४ आयटीआय संस्थांमध्ये यंदा १ लाख ५७ हजार ६६४ जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.
नोंदणी आणि शुल्कासह अर्ज करण्यासाठी २१ मे ते २१ जूनपर्यंत, तर पसंतीक्रम भरण्यासाठी २३ जूनपर्यंत मुदत दिली होती. २५ जूनला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली. तर २८ जूनला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. परंतु, ती २९ जूनला जाहीर करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
टॉप ट्रेडमधील जागा
इलेक्ट्रिशियन : २५ हजार १४०
फिटर : २३ हजार ४२०
वेल्डर : १७ हजार ३४०
कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट : १० हजार ८२४
मेकॅनिक डिझेल : ८ हजार ६४
वायरमन : ७ हजार २००
मेकॅनिक (मोटार वाहन) : ६ हजार ६९६
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : ४ हजार ६३२
ड्रेस मेकिंग : ४ हजार ४८०
टर्नर : ३ हजार ७२०