

पुणे: राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांना यंदा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे उघडकीस आले आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ५४ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. गेल्या वर्षीची तुलना केली, तर तब्बल ३२.१६ टक्के प्रवेश घटल्याचे उघडकीस आले आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरातील १ लाख ४५ हजार १४४ जागांसाठी आत्तापर्यंत कॅपच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या तिन्ही फेऱ्यांमध्ये मिळून शासकीय संस्थामधून ६२ हजार ६३४ तर खासगी संस्थांमधून १६ हजार ६४४ अशा एकूण ७९ हजार २७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
तर गेल्या वर्षी संबंधित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर शासकीय संस्थां मधून ९० हजार १०६ तर खासगी संस्थांमधून ४० हजार ६३९ अशा एकूण १ लाख ३० हजार ७४५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यामुळे यंदा खासगी आणि शासकीय अशा दोन्ही आयटीआयच्या प्रवेशांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. रिक्त जागांचा विचार केला तर गेल्या वर्षी ८६.७८ टक्के प्रवेश झाले होते. यंदा केवळ ५४.६२ टक्के प्रवेश झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आयटीआयचा टक्का का घटला?
यंदा आयटीआय प्रवेश प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी काही कागदपत्रांची सक्ती करण्यात आली. डोमासाईल सारखे कागदपत्र अनिवार्य करण्यात आल्यामुळे ते वेळेत उपलब्ध करणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही. अन्य कारणांमुळे विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेश प्रक्रियेकडे कानाडोळा केला असल्याचे आयटीआयच्या संस्थाचालकांनी स्पष्ट केले आहे.
टॉप ट्रेडमधील जागा
इलेक्ट्रिशियन : २५ हजार १४०
फिटर : २३ हजार ४२०
वेल्डर : १७ हजार ३४०
कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग
असिस्टंट : १० हजार ८२४
मेकॅनिक डिझेल : ८ हजार ६४
वायरमन : ७ हजार २००
मेकॅनिक (मोटार वाहन) : ६ हजार ६९६
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : ४ हजार ६३२
ड्रेस मेकिंग : ४ हजार ४८०
टर्नर : ३ हजार ७२०