

पुणे: यंदाच्या वर्षापासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक, तसेच प्रमाणपत्र वेगवेगळे न देता एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, संबंधित प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचा फोटो देखील लावण्यात येणार आहे. त्यामुळे त्यानुसार विभागीय मंडळांनी कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिले आहेत.
डॉ. माळी यांनी दिलेल्या निर्देशानुसार फेबुवारी-मार्च 2026 परीक्षेपासून दहावी-बारावीच्या प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र न देता ती ‘एकत्रित’ देण्यात येणार आहेत. तसेच एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या क्रमाने छपाई करण्यात येणार आहे.
यासंदर्भात फेबुवारी-मार्च 2026च्या प्रवेशपत्रांवरील छायाचित्र अस्पष्ट असल्यास, त्यावर योग्य फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी स्वाक्षरी करण्याचे निर्देश यापूर्वी दिलेले आहेतच. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांचे फोटो दुरुस्त केले आहेत, त्यांची माहिती एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर अचूक छापण्यासाठी पुन्हा अपलोड करणे आवश्यक आहे.
त्याकरिता मंडळाच्या संकेतस्थळावर फोटो करेक्शन ही लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याद्वारे फोटो दुरुस्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या नावाच्या बदललेल्या क्रमाबाबतही सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविणे गरजेचे आहे.
त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या नावात त्रुटी उद्भवणार असल्यास त्याबाबतची दुरस्ती विभागीय मंडळांमार्फत तातडीने करून घेण्याबाबत आपल्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी तसेच सर्व संबंधित घटकांना लिखित स्वरूपात अवगत करून देण्याबाबतची पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी आणि संबंधित अहवाल राज्य मंडळास सादर करावा, असे देखील डॉ. माळी यांनी स्पष्ट केले आहे.