

गणेश खळदकर
पुणे : विद्यार्थ्यांना दहावी- बारावीची प्रमाणपत्रे विविध कामांसाठी गरजेची असतात. परंतु, ती हरवली किंवा त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता वाटली तर विभागीय मंडळांमध्ये जाऊन हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित प्रक्रिया अत्यंत किचकट वाटत होती. परंतु त्यामध्ये बदल करण्यात आला असून संबंधित प्रमाणपत्रे आता ऑनलाइन देणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षेचे व्दितीय गुणपत्रक / प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र व स्थलांतर प्रमाणपत्र देण्यासाठी मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने कार्यपध्दती सुरू करण्यात आली आहे. द्वितीय गुणपत्रक / प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी यापूर्वीचे सर्व प्रकारचे शुल्क रद्द करण्यात आले आहे. व्दितीय गुणपत्रक / प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी प्रतिप्रमाणपत्र पाचशे रुपये शुल्क आकारण्यात यावे (कोणत्याही प्रतीसाठी) मागणी अर्जासाठी स्वतंत्र शुल्क आकारू नये, असेदेखील मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांना यासाठी आधारकार्ड ओटीपी बेस्डच्या आधारे संबंधित प्रमाणपत्रांसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यासंबंधीची कार्यवाही विभागीय मंडळाना तीन दिवसांमध्येच पूर्ण करावी लागणार आहे. सद्य:स्थितीत 1990 सालापासून ई-मार्कशिट प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचा सर्व डाटा उपलब्ध आहे. त्यामुळे 1990 नंतरचे द्वितीय गुणपत्रक / प्रमाणपत्राची मागणी आल्यास त्याची सॉफ्ट कॉपी अर्जदार तसेच विभागीय मंडळास उपलब्ध होईल. प्रमाणपत्राची मागणी पोस्टाने केल्यास ते स्पीड पोस्टव्दारे पाठविण्यात येणार आहे.
प्रचलित पद्धतीमध्ये द्वितीय प्रमाणपत्रावर संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचा शिक्का, मुख्याध्यापक, प्राचार्य यांची स्वाक्षरी घेण्यात येत होती. परंतु सद्यःस्थितीत ऑनलाइन प्रणालीमध्ये माध्यमिक शाळेचे, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिफारसपत्र घेण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच द्वितीय प्रमाणपत्रावर संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचा शिक्का, मुख्याध्यापक, प्राचार्य यांची स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता असणार नाही.
ऑनलाइन प्रणालीत एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही. तरी याबाबत सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सुचित करावे, असे देखील डॉ. माळी यांनी स्पष्ट केले आहे.