बारामती : बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शुक्रवारच्या (दि. 21) तारखेपर्यंत आठ नगरसेवकांच्या जागा बिनविरोध करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला यश आले. अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून दोघांनी तर नगरसेवकपदाच्या शर्यतीतून 77 जणांनी माघार घेतली. 14 जण येथे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत, तर नगरसेवकपदाच्या उर्वरित 33 जागांसाठी 145 एवढे विक्रमी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केलेले प्रभाग दोन ‘अ’ मधून अनुप्रिता तांबे या बिनविरोध असल्याचे अर्ज छाननी वेळीच स्पष्ट झाले होते. या शिवाय शुक्रवारी प्रभाग पाच ‘अ’ मधून किशोर मासाळ, प्रभाग सहा ‘अ’ मधून धनश्री बांदल, सहा ‘ब’ मधून अभिजित जाधव, प्रभाग आठ मधून श्वेता नाळे, प्रभाग 17 ‘ब’ मधून शर्मिला ढवाण, प्रभाग 18 ‘ब’ मधून अश्विनी सातव व प्रभाग 20 ‘ब’ मधून आफिन बागवान हे उमेदवार बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.
नगराध्यक्षपदासाठी बारामतीत आता 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात राष्ट्रवादी (अ. प.) पक्षाचे सचिन सातव, राष्ट्रवादी (श. प.) पक्षाचे बळवंत बेलदार, भाजपचे गोविंद देवकाते, शिवसेनेचे सुरेंद्र जेवरे, बहुजन समाज पक्षाचे काळूराम चौधरी, स्वराज्य शक्ती सेनेचे तुषार अल्हट, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे विराज शिंदे यांच्यासह अन्य सात अपक्षांचा त्यात समावेश आहे.
आठ उमेदवार बिनविरोध झाल्याने ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी समाधान व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतल्याने हे शक्य झाल्याचे ते म्हणाले.
दरम्यान बारामतीच्या रणांगणात युती, आघाडी होणार का? या प्रश्नाला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. कॉंग्रेससह, दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, दोन्ही शिवसेना, बहुजन समाज पक्ष व अन्य पक्षांनी आपापली स्वतंत्र दावेदारी कायम ठेवली. त्यामुळे बारामतीच्या स्तरावर आजच्या घडीला तरी कोणत्याही पक्षाची युती, आघाडी झालेली नाही.