पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुलीचे धर्मांतर केल्याचा मुस्लिम पतीवर आरोप करणार्या या प्रकरणाला 'लव्ह जिहाद' चा रंग देणा-या पालकांना न्यायालयाने चपराक दिली असून, पतीविरोधात मुलीच्या पालकांनी केलेला हस्तक्षेप अर्ज न्यायालयाने फेटाळला. मुलगी ही सज्ञान आहे. तिला पतीसमवेत राहाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. गाडे यांनी दिला.
एखादया मुलीने मुस्लिम व्यक्तीशी विवाह करून स्वेच्छेने जरी धर्मांतर केले असले तरी अशा प्रकरणांना लव्ह जिहादचा रंग दिला जात आहे. या प्रकरणातही मुलीच्या आईवडिलांनी तिचे जबरदस्तीने धर्मांतर करुन लग्न लावण्यात आले असल्याचा आरोप ठेवत मुस्लिम पतीविरोधात न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता.
मुलीची 41 वर्षीय मुस्लिम तरुणाशी ओळख झाल्याने त्याने तिला हळूहळू प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिची मुस्लिम धर्मांतराची प्रक्रिया पार पाडली आणि त्यानंतर तिच्याशी लग्न केले, असे तिच्या घरच्यांनी व्हाट्सअपचे मेसेज बघितल्यानंतर सांगितले.
मुलीला महिला संरक्षणगृहामध्ये ठेवावे तिला सुधारायला संधी द्यावी असा युक्तिवाद वकिलांनी केला. न्यायालयाने मुलीचे म्हणणेही ऐकून घेतले. तिला आई-वडिलांबरोबर नव्हे तर पतीबरोबर राहायचे आहे असे तिच्या बोलण्यातून न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यावर न्यायालयाने मुलगी तिचा निर्णय स्वत: घेऊ शकते असे सांगत हस्तक्षेप अर्ज फेटाळला.
हेही वाचा