पुणे : पालिका भूजल स्रोतांचे सर्वेक्षण करणार

पुणे : पालिका भूजल स्रोतांचे सर्वेक्षण करणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सिमेंट रस्ते यामुळे शहरात पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याने भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे शहरातील भूजल स्रोतांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे वापराचे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.

त्यातच पावसाची अनियमितता दिसून येत आहे. पाणीपुरवठा यंत्रणेवर ताण येत आहे. तसेच तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. यामुळे उपनगरात अनेक मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तेथे विंधनविहिरी (बोअरवेल)चा वापर केला जात आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उपाययोजना करण्यासंदर्भात महापालिकेत बुधवारी बैठक झाली.

या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शहरात अनेक ठिकाणी बोअरवेल आहेत, विहिरी, तलाव आहे या भूजल स्रोतांची माहिती गोळा केली जाणार आहे. वाढणार्‍या बांधकामामुळे भूजल स्रोतांना अडथळे निर्माण होतात. ते स्रोत बाधित झाल्याने आणि उपसा वाढल्याने अनेक ठिकाणी भूजलाची पातळी खालवत आहे. ही पातळी वाढविण्यासाठी महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती या बैठकीत दिली गेली. तसेच भूजलाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणाची माहिती संदर्भित केली जाणार आहे.

बैठकीत उपस्थित संस्थांच्या प्रतिनिधींकडून विविध प्रकल्पांचे आराखडे सादर केले गेले. यामध्ये वॉटर पार्क तयार करणे, भूजल स्रोतांचे पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टींग आदीचा समावेश होता. बांधकाम व्यावसायिकांची भूजल स्रोतांचे संवर्धन करण्यात मदत घेण्यात येणार आहे. याकरिता वर्षभर विविध प्रकारची कार्यशाळा, जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. या सर्वेक्षणासाठी जिओलॉजीचा अभ्यास करणार्‍या संस्था तसेच या विषयाचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची मदत घेणार असल्याचे डॉ. खेमनार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news