

लोणी काळभोर: लाल मातीच्या व्यवहारातील अवघ्या ५ हजार रुपयांच्या वादाचे पर्यवसान दोन गटांतील हाणामारीत झाल्याची घटना आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे रविवारी (दि. ९) घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष भाऊसाहेब जवळकर हे नर्सरी व्यवसाय करतात. नर्सरीसाठी लाल माती पुरविण्याचा व्यवहार केतन दीपक जवळकर व कुणाल दीपक जवळकर यांच्यासोबत झाला होता. एका हायवा लाल मातीसाठी १८ हजार रुपये ठरले होते. त्यापैकी १० हजार रुपये रोख आणि उर्वरित ८ हजार रुपये दिल्यानंतर आणखी ५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप मनीष जवळकर यांनी तक्रारीत केला आहे. ९ ऑगस्ट रोजी सकाळी याच व्यवहारावरून नर्सरीत वाद झाला.
त्यानंतर सायंकाळी मनीष जवळकर हे पत्नीसमवेत दुचाकीवरून घरी जात असताना केतन व कुणाल यांनी रस्त्यात अडवून धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या वेळी केतनने लोखंडी हत्याराने मनीष यांच्या खांद्यावर वार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, वाचविण्यासाठी आलेल्या भावावरही हल्ला करून पत्नीला मारहाण केली. यात मनीष जखमी झाले असून, त्यांचा भाऊ धनंजय यालाही दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. मनीष व त्यांचा भाऊ यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिसांनी केतन दीपक आणि कुणाल जवळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या गटाचीही तक्रार
दरम्यान, केतन जवळकर यांनीही लोणी काळभोर पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, गणेश जवळकर, मनीष ऊर्फ मनोज जवळकर, राहुल जवळकर, सचिन जवळकर आमि धनंजय जवळकर यांनी घराच्या पोर्चमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून केतन यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली.
या पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा, शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केतन जवळकर यांनी केला आहे. तसेच, हायवा पेटवून देण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तर, हल्लेखोर निघून जाताना कार आणि इलेक्ट्रिक दुचाकीची तोडफोड केल्याचा आरोपही केतन यांनी केला आहे. या तक्रारीवरून गणेश जवळकर, मनीष ऊर्फ मनोज जवळकर, राहुल जवळकर, सचिन जवळकर आणि धनंजय जवळकर या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.