शिवनगर : बारामती लोकसभा मतदारसंघातील नणंद विरुद्ध भावजय अर्थात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या 'हायव्होल्टेज' लढतीच्या निकालाबाबत अंदाज वर्तवले जात असताना अनेक ठिकाणी पैजा लागत आहेत. तर सखोल चर्चा होऊन 4 जूनच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सुरुवातीपासूनच उत्सुकतेची ठरली होती. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते माघारीपर्यंत उत्सुकता लागली होती. मात्र, ज्यावेळी उमेदवारी निश्चित झाली त्या वेळी सर्वच जण संभ्रमित झाले. कारण बारामतीच्या पवार परिवाराच्या इतिहासातील पहिलीच निवडणूक जी पवार विरुद्ध पवार असे होताना दिसत होती. या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान दोन्ही पक्षाकडून अनेक आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. मात्र, आता प्रचार ही संपला मतदान ही झाले. या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीत आता कोणता उमेदवार निवडून येणार ? किती मताने निवडून येणार ? याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, हे अंदाज व्यक्त करत असताना दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार जास्तीच्या मताने कसा निवडून येणार हे अगदी आकडेवारीसह सांगताना दिसत आहे. यामध्ये एका जागी हॉटेलमध्ये बसून इंदापूरपासून ते खडकवासल्यापर्यंतच्या सहाही मतदारसंघातील मतदारांनी कशाप्रकारे मतदान केले असेल याबाबत चर्चा घडताना दिसत आहेत, तर कोणता विधानसभा मतदारसंघ कोणत्या उमेदवाराला अधिकचे मताधिक्य देईल तर दिलेले मतदानाचे मताधिक्य कोणता मतदारसंघ कव्हर करेल याबाबतदेखील अंदाज वर्तवले जात आहेत.दरम्यान, अशावेळी प्रत्येक गावागावात अंदाज वर्तवणारे गावपातळीवरील कोणत्या बुथवर किती मतदान झाले तसेच झालेले मतदान कोणत्या उमेदवाराला अधिकचे झाले याबाबतदेखील मते व्यक्त करत आहेत.
दरम्यान, हे सर्व अंदाज व्यक्त होत असताना काही ठिकाणी चर्चा रंगतदार आणि टोकाच्या होताना दिसतात. अनेक वेळा अंदाज व्यक्त करणारे कार्यकर्ते आपलेच म्हणणे खरे आहे हे समोरच्याला पटवून देताना मोठ्या आवाजात बोलून शपथ घेताना दिसत आहेत, तर अनेक ठिकाणी अंदाज वर्तवताना सुरू असलेली चर्चा वेगळ्या वळणावर जाऊन हमरीतुमरी होताना दिसत आहे, तर अनेक ठिकाणी पैजा लागत आहेत. यामध्ये चर्चेमधील उपस्थित व्यक्तींना फुल जेवण, तर एकमेकांना संपूर्ण पोशाखाचीदेखील पैज लागत आहे. तर काही ठिकाणी जेवणातील एखादा पदार्थ वर्ज करणार, अशा पैजा लागत आहेत. एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघातील नणंद विरुद्ध भावजय तथा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या 'हायव्होल्टेज' लढतीच्या निकालाकडे देशातील जनतेचे लक्ष लागले आहे.
झालेल्या निवडणुकीतील मतदानावर बांधण्यात येणारे अंदाज हे पूर्वी झालेल्या निवडणुकीच्या निकालाच्या आकडेवारी वरून बांधले जात आहेत.अशा वेळी अगदी काटेकोरपणे आकडेमोड करून कोणता उमेदवार निवडून येणार याबाबत भाकीत वर्तविले जात आहे.
हेही वाचा