

पुणे: भारतातील महत्त्वाचे लष्करी विमानतळ असलेल्या लोहगाव विमानतळाभोवती कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वेळोवेळी कचरा उचलला जात नसल्याने विमानतळावर पक्ष्यांचा वावर वाढला आहे. तसेच, आजूबाजूच्या परिसरातील सामान्य नागरिक देखील विनापरवानगी ड्रोन उडवत असल्याने त्याचाही धोका लष्करी विमानतळाला वाढला आहे. प्रामुख्याने घार, ससाणा, कबुतर, पोपटांसह २० प्रकारच्या पक्ष्यांचा वावर विमानतळाभोवती वाढल्याने बर्ड हिटिंगचा धोका वाढला आहे. यामुळे अनेकदा विमानांच्या उड्डाण व उतरण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून, 'बर्ड हिट' टाळण्यासाठी भारतीय हवाई दलाला विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागत आहेत.
भारतीय हवाई दलाच्या वतीने आयोजित केलेल्या एका अनौपचारिक भेट दौऱ्यात ही माहिती समोर आली. लोहगाव विमानतळाभोवती मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. तसेच, दररोज होणारी नागरी उड्डाणेही २४० वर गेली आहेत. हा आकडा महिन्याला १७०० वर गेला आहे. त्यामुळे एखादा पक्षी विमानासमोर आला तरी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांचा बराचसा वेळ बर्ड वॉचिंग या कामासाठी जात असल्याची खंत हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
विमानतळ परिसरातील कचऱ्याचे ढीग, पाणथळ जागा आणि पावसाळ्यानंतर वाढणारे कीटक, यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षी आकर्षित होतात. विशेषतः धावपट्टीच्या आसपास आणि तळाबाहेरील मोकळ्या जागांमध्ये अन्नाची उपलब्धता वाढल्याने पक्ष्यांची संख्या लक्षणीय वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिकेसोबत समन्वय वाढवला
पुणे हवाई दल तळाचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर सतबीर सिंह यांनी सांगितले की, महापालिकेसोबत नियमित बैठका घेऊन कचरा व्यवस्थापनाबाबत चर्चा केली जात आहे. महापालिकेकडून कचरा उचलण्याचे प्रयत्न सुरू असले तरी ही समस्या अद्याप पूर्णपणे सुटलेली नाही. हवाई दलाचे अधिकारी महापालिकेच्या कचरा डेपोचीही पाहणी करून पक्ष्यांची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक उपाय योजनांबाबत चर्चा करीत आहेत.
विमानतळाभोवती हे आहेत धोके
विमानांसाठी घार हा सर्वाधिक धोकादायक पक्षी आहे. हा पक्षी तब्बल एक किलोमीटर उंचीपर्यंत झेप घेऊ शकतो. त्यामुळे वैमानिकांसाठी तो मोठे आव्हान ठरतो. पावसानंतर धावपट्टी आणि आसपासच्या परिसरात कीटक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याने घारींचे थवे येथे जमा होतात. इतर पक्षी विमानाच्या आवाजाला घाबरतात, पण घार विमानाच्या आवाजाला घाबरत नाही.
विमानतळापासून तीन कि.मी.च्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी आहे. मात्र, काही नागरिक मुलांच्या वाढदिवसाला ड्रोन गिफ्ट देत असल्याचे निदर्शनास आले. त्याचा सर्व्हे करून तेथे ड्रोन उडवण्यापासून परावृत्त करण्यात आले. नागरी भागातून ड्रोन उडवण्याच्या घटना ही चिंतेची बाब ठरत आहे.
हवाई दल पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी ध्वनिनिर्मिती करणारी यंत्रणा, मोबाईल स्केअरर्स, डिटरंट गन आदी साधनांचा वापर करीत आहे. मात्र, घारी आवाजामुळे सहज पळून जात नाहीत. काहीवेळा ड्रोनच्या साहाय्याने त्यांना हुसकावण्याचाही प्रयत्न करण्यात येतो. परंतु, त्यालाही अपेक्षित यश मिळाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सुखोई-३० एमकेआयसारखी लढाऊ विमाने काही टप्प्यांवर ताशी ७०० किलोमीटर वेगाने उड्डाण करतात. अशा वेळी मोठ्या आकाराच्या घारीची धडक बसल्यास विमानाचे मोठे नुकसान होण्याची तसेच गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असते. पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानांची मजबूत काच फुटून वैमानिक गंभीर जखमी झल्याची उदाहरणे त्यांनी सांगितली.
पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या दिल्ली मुख्यालयात स्वतंत्र 'ऑर्निथॉलॉजी सेल' कार्यरत आहे. या विभागातील तज्ज्ञ विविध हवाईतळांवर नियमित पाहणी करून पक्ष्यांच्या हालचालींचा अभ्यास करतात. त्यानुसार संबंधित हवाईतळांना अहवाल देऊन धोकादायक क्षेत्रांची माहिती दिली जाते.