

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील १४ नंबर परिसरातील तुळजाभवानी कला केंद्र येथे गाणी लावण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबाराच्या घटनेत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शनिवार (दि. ८) पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या गोळीबारात फिरोज कादिर शेख (वय ३१, रा. ओतूर) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ नंबर येथील तुळजाभवानी कला केंद्र परिसरात रात्रीच्या सुमारास गाणी लावण्यावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर गोळीबार झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
गोळीबारात फिरोज शेख जखमी झाल्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती व जखमेचे स्वरूप याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेशी संबंधित माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, गोळीबार करणारे तरुण चाकण परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. गोळीबारानंतर संबंधित तरुण घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास सुरू करण्यात आला आहे.
गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, किती जणांचा या घटनेत सहभाग होता, गोळीबारासाठी कोणते शस्त्र वापरण्यात आले तसेच जखमी तरुणाला गोळी नेमकी कुठे लागली, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
घटनास्थळावरील पुरावे तपासण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे (फॉरेन्सिक) पथक देखील दाखल झाले आहे. या पथकाकडून घटनास्थळाची तपासणी करून आवश्यक पुरावे संकलित करण्यात येत आहेत.
या घटनेनंतर १४ नंबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.