

Ketan Agarwal Murder Case: पुण्यातील गाजलेल्या लोहगड हत्याकांडाच्या तपासात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची आता पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, त्यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली याचीही माहिती समोर आली आहे.
पोलिस तपासानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पहिली भेट गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीत झाली होती. या भेटीनंतर दोघांमध्ये ओळख वाढली, नियमित संवाद सुरू झाला आणि पुढे त्यांचे प्रेमसंबंध जुळल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया पुण्यातील गंगाधाम परिसरातील न्यू एरा सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिच्या कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ आहे. सियाचे वडील प्रवीण गोयल हे ड्रायफ्रूट आणि मसाल्यांच्या व्यवसायाशी संबंधित असून त्यांचे स्वतःचे आऊटलेट आहेत.
दुसरीकडे, आरोपी चेतन चौधरी हाही ड्रायफ्रूट व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने बीबीएचे शिक्षण सुरू केले होते; मात्र ते पूर्ण न करता वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिस दोघांमधील संबंध, मोबाईल कॉल रेकॉर्ड, चॅट्स, भेटीगाठी आणि डिजिटल पुराव्यांची बारकाईने तपासणी करत आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या मते, केतन अग्रवालच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनांची साखळी समजून घेण्यासाठी सिया आणि चेतन यांच्या नात्याचा संपूर्ण प्रवास तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणातील प्रत्येक पुरावा आणि साक्षीदारांच्या जबाबांची पडताळणी सुरू असून, तपास अद्याप सुरू आहे. या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार असून, आरोप सिद्ध होईपर्यंत आरोपींना कायद्याच्या दृष्टीने निर्दोष मानले जाते.