पुणे : खेड-शिवापूर नाक्यावर स्थानिक वाहनांनाही टोल
खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा
खेड-शिवापूर टोल नाक्यावर आता एमएच 12, एमएच 14 या स्थानिक वाहनांनाही टोल आकारला जात आहे. यापूर्वी असलेली टोलमाफी दि. 1 मार्चपासून बंद करण्यात आली आहे. पुणे-सातारा रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून वाहतूक सुरळीत सुरू असल्याने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी दिली.
दरम्यान, पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची रखडलेली कामे पूर्ण करावी आणि खेड शिवापूर टोलनाका येथून हटविण्याच्या मागणीसाठी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने काही वर्षांपूर्वी आंदोलन केले होते. त्यावेळी टोल हटविण्याबाबत ठोस निर्णय होईपर्यंत एमएच 12 आणि एमएच 14 या स्थानिक वाहनांना टोलमाफी देण्यात येईल, असे "एनएचएआय"ने सांगितले होते. त्यानुसार खेड शिवापूर टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोल घेतला जात नव्हता.
रस्त्याच्या रुंदीकरणाचे अपूर्ण काम अंतिम टप्प्यात आहे. वरवे येथील उड्डाणपूल सुरू झाला आहे. त्यामुळे आता एमएच 12, एमएच 14 या वाहनांकडूनही दि. 1 मार्च 2022 पासून टोल आकारण्यात येत आहे, असे 'एनएचएआय"च्या जनसंपर्क विभागाने सांगितले.
पुणे-सातारा रस्त्याची जवळपास सर्व कामे पूर्ण झाली आहेत. वाहतूक कोंडी होत नाही की खड्डे नाहीत. त्यामुळे एमएच 12 आणि एमएच 14 या स्थानिक वाहनांना टोल घेण्यात येत आहे.
– अमित भाटिया, व्यवस्थापक, पुणे-सातारा टोल नाकाखेड-शिवापूर टोलनाका "पीएमआरडीए" हद्दीबाहेर गेलाच पाहिजे. तो जोपर्यंत येथून हटत नाही तोपर्यंत टोलमाफीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत.
– माउली दारवटकर, निमंत्रक, खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती

