पुणे : झुकझुक गाडी पाहूया वर्षाविहारासाठी जाऊया
पुणे; पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे रेल्वेच्या पुणे विभागात कोणतेही अपघात घडू नये, याकरिता रेल्वेचा पुणे विभाग सज्ज झाला आहे. रेल्वेकडून विभागातील तब्बल 531 किलोमीटर अंतराच्या ट्रॅकची तपासणी कामे, विद्युतीकरणाची कामे पूर्ण करून धोकादायक दरडी हटविल्या आहेत. त्यामुळे वर्षाविहारासाठी 'झुकझुक गाडी' सुरक्षेसह सज्ज झाली आहे.
पावसाळ्यात दरडी कोसळणे, पाण्यामुळे रेल्वेट्रॅकचे नुकसान होऊन मोठे अपघात घडण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) इंदू दुबे यांनी दिली. तब्बल 531 किलोमीटर अंतराची ट्रॅकमॅनच्या पथकाने तपासणी केली. घाट विभागासह विद्युतीकरणाच्या तारांची (ओएचई) पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले.
काय केल्या उपाययोजना..?
अतिसंवेदनशील (दरड कोसळणारी ठिकाणे) ठिकाणी पहारेकरी तैनात
गस्त घालण्यासाठी पेट्रोलिंग पथके सज्ज
मिरज ते शेलारवाडी यादरम्यान राखीव डबे
घाट परिसरात बोल्डर टाकण्याचे काम पूर्ण
कॅच वॉटर ड्रेन आणि साइड ड्रेन स्वच्छ
स्थानकांवरील छप्परगळती थांबवली
ओव्हरहेड केबलजवळील फांद्यांची छाटणी
धोकादायक दरडी हटविल्या
वाठार-लोणंदजवळील आदरकी-सलपा विभाग हा पूर्णत: घाट विभाग आहे. या ठिकाणी रेल्वेट्रॅकवर दरडी कोसळण्याचा मोठा धोका असतो. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या पुणे विभागाकडून या विभागात विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. धोकादायक दरडी अगोदरच पाडण्यात आल्या असून, येथील घाट परिसरात बोल्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
रेल्वेच्या पुणे विभागाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता पुणे विभागात असलेल्या सर्व ट्रॅकची तपासणी करण्यात आली. संवेदनशील ठिकाणी देखरेखीसाठी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
– डॉ. रामदास भिसे,
जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग
हेही वाचा

