

खेड: खरपुडी खंडोबा , तालुका खेड येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखले जाणारे मंदिर शुक्रवारी (दि ५) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांच्या तावडीत सापडले. चोरट्यांनी मुख्य मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश करत कुलदैवत खंडोबा, म्हाळसा व बानू देवीच्या मूर्तींवरील चांदीचे दागिने, उत्सव मूर्ती, स्वयंभू पिंडीचा चांदीचा कवच, देवाची चांदीची पगडी, सहा मोठे चांदीचे हार, बानू-म्हाळसा मुकुट, सिंहासनावरील वाघाची मूर्ती असा एकूण सुमारे २१ किलो चांदीचा ऐवज व दानपेटी फोडून त्यातील सुमारे ६० ते ७० हजार रुपये असा एकूण अंदाजे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला.
शुक्रवारी सकाळी ही चोरी उघडकीस आली. गुरुवारी (४ डिसेंबर)रोजी रात्री मंदिर परिसरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डाव साधला. सकाळी पहाटे ५ वाजता पुजारी देवपूजा करण्यासाठी आले असता कुलूप तुटलेले व गाभारा उघडा दिसल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. माहिती कळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याने चोरट्यांचा तपास लावणे कठीण झाले आहे. चोरीची माहिती मिळताच राजगुरूनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा सुरू करण्यात आला आहे. चोरीचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात घडलेल्या या मोठ्या चोरीमुळे भाविकांमध्ये प्रचंड संताप व नाराजी पसरली आहे. मंदिर ट्रस्टकडूनही सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात चोरीची घटना घडल्याने भाविकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली असून पोलिसांनी तत्काळ छडा लावला पाहिजे असे खेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दशरथ गाडे यांनी म्हटले आहे.