आरोग्य विभागाच्या पेपरला मुंबईतूनच फुटले पाय

Paper Leak Case
Paper Leak Case
Published on
Updated on
  • आरोग्य विभागातील पेपरफुटीचे प्रकरण

  • धागेदोरे आरोग्य संचालनालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत

  • मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आरोग्य विभागातील लेखी परीक्षेच्या पेपरफुटीचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहचले असून, मुंबईतील आरोग्य संचालनालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून हा पेपर बाहेर आल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी सहसंचालक महेश सत्यवान बोटले (वय 53) याला अटक केली आहे.

लेखी परीक्षेचा पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत बोटले होता. त्यामुळे त्याला संबंधित पेपरचा 'अ‍ॅक्सेस' देण्यात आला होता. त्यातूनच त्याने पेपर बाहेर काढल्याची माहिती आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लातूर येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याने आपल्याला बोटले याच्याकडून पेपर मिळाल्याची कबुली दिल्याचे सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

आतापर्यंत ११ जणांना अटक

आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी सायबर पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. हा पेपरफुटीमधील एजंट, क्लासचालक, शासकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी यांच्यापासून थेट प्रत्यक्ष पेपर बाहेर काढणार्‍या व्यक्तीपर्यंत पोहचण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. त्यात अनेक मोठमोठे अधिकारी सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

महेश बोटले याच्याकडे पेपरसेटरांशी संपर्क साधणे, तो सुरक्षित ठेवणे, परीक्षा घेणार्‍या कंपनीशी संपर्क ठेवणे, अशी जबाबदारी असल्याचे पुढे आले आहे. पेपर तयार करणार्‍या समितीमध्येही बोटले याचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. बडगिरे याच्याकडून जेवढ्या लोकांना हा पेपर देण्यात आला होता, त्यातील अर्धा मोबदला बोटले याला मिळणार होता, अशीदेखील माहिती समोर आली आहे.

प्रशांत बडगिरे याला मंगळवारी अटक केल्यानंतर सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी त्याची चौकशी केली. त्यातून या पेपरफुटीसंबंधी अनेक बाबी पुढे आल्या आहेत. त्यातूनच बडगिरे याने महेश बोटले याच्याकडून पेपर मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर बुधवारी सकाळी सायबर पोलिसांच्या पथकाने मुंबईतून बोटले याला ताब्यात घेतले. त्याच्या कार्यालय व घराची झडती घेण्यात आली. बुधवारी दुपारी बोटले याला पुण्यात आणले. त्याला अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.

प्रशांत बडगिरेला मिळाले 33 लाख

बडगिरे याने आपल्याला 15 लाख मिळाल्याचे अगोदर सांगितले होते. मात्र, अधिक चौकशीत त्याने आपल्याला 33 लाख मिळाल्याची कबुली दिली आहे. बडगिरे याने ज्यांच्याकडून पैसे घेऊन पेपर पुरविला, त्यांनी तो पुढे अनेक एजंट, क्लासचालकांना पुरवून त्यातून आतापर्यंत 80 लाख रुपये उकळल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पेपरफुटीत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचेदेखील समजते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news