पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सन 2023-24 या आर्थिक वर्षातील अवघ्या दोन महिन्यांत 204 कोटी रुपयांचा मिळकतकर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. एकूण 25 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी कराचे बिल भरले आहेत. निवासी मिळकतधारकांनी बिल भरण्यात आघाडी घेतली आहे. त्यामध्ये ऑनलाइन बिल भरण्याचे प्रमाण सर्वांधिक आहे.
निवासी, औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा एकूण 6 लाख 2 हजार 203 मिळकतींची नोंद करसंकलन कार्यालयाकडे आहे. दोन महिन्यांत 1 लाख 62 हजार नागरिकांनी 204 कोटी 66 हजार रुपयांचा बिल भरणा केला आहे. एक लाख 22 हजार 931 मिळकतधारकांनी ऑनलाइन कर भरला आहे. त्यांनी एकूण 151 कोटी 96 लाख 28 हजार रुपयांचा कर भरणा केला आहे.
विविध अॅपच्या माध्यमातून 2 हजार 746 जणांनी 2 कोटी 42 लाख 87 हजारांची बिल भरले आहेत. पाच हजार 669 जणांनी 16 कोटी 23 लाख रुपये धनादेशाद्वारे जमा केले आहेत. ज्येष्ठ नागरिक व ज्या नागरिकांना ऑनलाइन बिल भरण्यात अडचण येणार्या 27 हजार 683 नागरिकांनी 25 कोटी 85 लाख 83 हजार रुपयांचा रोखीने भरणा केला आहे.
एक लाख 46 हजार 91 निवासी मिळकतधारकांनी बिलाचा भरणा केला आहे. त्यानंतर 11 हजार 675 बिगरनिवासी, 2 हजार 789 मिश्र, 1 हजार 45 औद्योगिक तर, 974 मोकळ्या जमीन असणार्या नागरिकांनी बिल भरले आहे. वाकड झोनमध्ये सर्वांधिक 24 हजार 396 जणांनी तर, सर्वात कमी पिंपरी कॅम्प झोनमध्ये 1 हजार 622 जणांनी कर भरला आहे. मिळकतधारकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास 8888006666 या सारथी हेल्पलाईनवर हेल्पलाइनवर फोन केल्यास नागरिकांच्या शंकांचे निरसन केले जाते, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
ऑनलाइन-151 कोटी 96 लाख 28 हजार
अॅपद्वारे -2 कोटी 42 लाख 87 हजार
रोख-25 कोटी 85 लाख 83 हजार
धनादेश-16 कोटी 23 लाख
आरटीजीएस-3 कोटी 42 लाख
हेही वाचा