अहमदनगरमध्ये उरूस मिरवणुकीत झळकले औरंगजेबाचे फोटो | पुढारी

अहमदनगरमध्ये उरूस मिरवणुकीत झळकले औरंगजेबाचे फोटो

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील फकीरवाडा परिसरात हजरत दंबाहरी हजरत यांच्या उरूसानिमित्त मुकुंदनगर भागातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही जणांनी औरंगजेबाचे फोटो झळकावत आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांशी संवाद साधत कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे समजते.

मोहम्मद सर्फराज इब्राहिम सय्य्द ऊर्फ सर्फराज जहागिरदार (रा.दर्गादायरा), अफनान आदिल शेख ऊर्फ खडा (रा.वाबळे कॉलनी), शेख सरवर (रा.झेंडीगेट), जावेद शेख ऊर्फ गब्बर (रा.आशा टॉकीज, अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. शहरातील मुकुंदनगर परिसरात रविवारी (दि.4) उरूस साजरा करण्यात आला. यावेळी डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली होती.

या मिरवणुकीत काही जणांनी औरंगजेबाचे फोटो हाती घेऊन आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. पोलिस नाईक सचिन धोंडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण सोळुंके करीत आहेत. दरम्यान, औरंगजेबाचे फोटो मिरवणुकीत झळकावणार्‍यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

औरंगजेबचे फोटो जर कोणी झळकवत असेल तर हे येथे मान्य केले जाणार नाही. या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कोणी औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला या ठिकाणी माफी नाही.

– देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री

हेही वाचा

अहमदनगर : विरोधकांकडून जातीपातीचे राजकारण : अमर साबळे

एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा काँग्रेस-राष्ट्रवादीत रंगला खेळ

माझी वसुंधरा अभियान : अहमदनगर जिल्हा परिषद राज्यात दुसरी..!

Back to top button