पिंपरी : गहुंजे खून प्रकरण; नातेवाइकांचा आक्रोश

पिंपरी : गहुंजे खून प्रकरण; नातेवाइकांचा आक्रोश

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गहुंजे येथे घरगुती कारणावरून पत्नीने पतीचा चाकूने वार करून खून केला. ही घटना रविवारी (दि. 4) दुपारी घडली. याप्रकरणी पत्नीने पोलिसांजवळ गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान, सोमवारी मृताच्या नातेवाइकांनी पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेत आक्रोश व्यक्त केला. आरोपीच्या अन्य नातेवाइकांची चौकशी करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा, अशी मागणी नातेवाइकांकडून या वेळी करण्यात आली आहे.

सूरज राजेंद्र काळभोर (28, रा. आकुर्डी) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. अंकिता सूरज काळभोर (वय 24) हिला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सूरज यांच्या आईने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अंकिताने सूरज यांना गहुंजे येथील शेतात फिरायला नेले. शेतात बसलेले असताना अंकिताने त्यांच्यावर धारदार हत्याराने आणि दगडाने मारून खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, सोमवारी दुपारी सूरज यांच्या नातेवाइकांनी पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला. नातेवाइकांनी सहायक पोलिस आयुक्तांना निवेदन दिले. सूरजचा खून हा अत्यंत थंड डोक्याने आणि सुनियोजितपणे केला आहे. त्यामुळे हा प्रकार अन्य लोकांच्या सहमतीने झाला असल्याचा संशय सूरज यांच्या नातेवाइकांना आहे. याबाबत अंकिताचे आई, वडील, भाऊ, मावशी, मामा, यांच्यासह अन्य नातेवाइकांकडे पोलिसांनी कसून चौकशी करावी. चौकशीत तथ्य आढळल्यास त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा. तसेच, सदर गुन्ह्यात 120 (ब) आणि 34 अशी कलमवाढ करावी, असे नातेवाइकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news