Lalit patil drug Case : ललितसह साथीदारांना पोलिस कोठडी

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पोलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांना पुणे पोलिसांनी बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांनाही 7 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांनी हा आदेश दिला. ललित अनिल पाटील (37, अक्षरधारा सोसायटी, मातोश्रीनगर, नाशिक), शिवाजी अंबादास शिंदे (40, रा. एकतानगर, बारगड, नाशिक) आणि राहुल पंडित ऊर्फ रोहितकुमार चौधरी ऊर्फ अमितकुमार (30, जनपूर धाव, विरार इस्ट, मूळ रा. बिहार) अशी पोलिस कोठडी झालेल्यांची नावे आहेत.

अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललितसह 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये सुभाष मंडल, रौफ शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, रेहान अन्सारी, अरविंदकुमार लोहरे, प्रज्ञा कांबळे, जिशान शेख यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. तर, ललितचे साथीदार समाधान बाबाजी कांबळे (रा. नाशिक), इम—ान शेख उर्फ आमिर खान (रा. धारावी, मुंबई), हरीश पंत (रा. मुंबई) यांना अटक करायची आहे.

ललितला मेफेड्रोन प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. ललितला ससूनमध्ये कोणी मदत केली?, तो कशाप्रकारे अन्य आरोपींच्या संपर्कात होता, याबाबतचा तपास सुरू आहे. त्याला मदत करणार्‍यांचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे. त्याचबरोबर आरोपींकडून 4 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकमधील शिंदे गावात श्री गणेशाय इंडस्ट्रीज नावाने सुरू केलेल्या कारखान्यात ललित आणि साथीदार मेफेड्रोन तयार करीत होते.

ललित कारागृहात असताना नाशिकमधील कारखान्यात मेफेड्रोन निर्मितीचे काम ललितचा भाऊ भूषण, साथीदार अभिषेक बलकवडे, राहुल पंडित ऊर्फ रोहितकुमार चौधरी, शिवाजी शिंदे, जिशान शेख, रेहान उर्फ गोलू आलम सुलतान अन्सारी यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्याअनुषंगाने सखोल तपास करायचा आहे. शिंदे मेफेड्रोन निर्मितीसाठी कच्चा माल पुरवत होता. पंडित मेफेड्रोन तयार करीत होता. आरोपी गोलू ऊर्फ रेहान अन्सारी मेफेड्रोनची विक्री करीत होता. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकत्रित चौकशी करायची असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती अ‍ॅड. नीलिमा इथापे-यादव यांनी न्यायालयाकडे केली.

त्याला बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. संदीप बाली, अ‍ॅड. एस. आर. ताटे आणि अ‍ॅड. विवेक राजापुरे यांनी बाजू मांडली. युक्तिवादावेळी ललितचे वकील अ‍ॅड. संदीप बाली यांनी ललितच्या जिवाला धोका आहे. त्याला चाकणच्या गुन्ह्यात अटक झाली असताना, तो दोन महिने ससून रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला मारहाण झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्याला पुरेसे संरक्षण पुरवावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली.

यापूर्वी अटक केलेल्यांना पुन्हा अटक करणार

ससूनमध्ये उपचार घेणार्‍या ललितला मदत करणार्‍यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी न्यायालयात दिली. तसेच, न्यायालयाच्या आदेशाने ज्या आरोपींना यापूर्वी अटक करून त्याच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी घेण्यात आली होती. त्यांना पुन्हा या गुन्ह्यात अटक करून समोरासमोर चौकशी करायची असल्याचेही तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले. रोहन चौधरी कामगार आहे, एका खेड्यातील आहे.

त्याला पालघर येथील फॅक्टरीच्या बाहेरून अटक केली आहे. त्याने ना कोणते इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे, ना कोणते सायन्सचे शिक्षण घेतले आहे. त्याला फॉर्म्युला कसा तयार करता येणार, असा युक्तिवाद अ‍ॅड. राजापुरे यांनी रोहन चौधरीच्या बाबत केला. त्यावर तपास अधिकारी तांबे यांनी त्याला विरोध करत तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्याचे न्यायालयाला सांगितले.

न्यायालयात कडक बंदोबस्त

ललित ससून रुग्णालयातून पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. ललितला न्यायालयात हजर करण्यापूर्वी शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तात ललितला न्यायालयात हजर करण्यात आले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news