नांदेड : मांजरम मंडळात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण, राजकीय नेत्यांना बंदी | पुढारी

नांदेड : मांजरम मंडळात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण, राजकीय नेत्यांना बंदी

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : नायगाव तालुक्यातील मांजरम मंडळात सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू केले आहे. मांजरम व कोलंबी येथील या आंदोलनाला मुस्लिम, राजपूत, गवळी, गंवडी व बौद्ध मातंगसह सर्व समाजातील बांधवांनी पाठींबा दर्शविला आहे. विद्यार्थी देखील या आंदोलनस्थळी जाऊन आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होत आहेत.

तालुक्यात सर्वाधिक मराठा समाज असलेले मांजरम हे गाव आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत असताना मांजरम व मांजरम सर्कल मधील मांजरम, कोलंबी, गडगा, रातोळी, टेंभुर्णी, लालवंडी, दरेंगाव, नरंगल, गोधमगाव, केदारवडगाव, नांवदी, कार्ला, आलूवडगाव, बेंद्री, आंचोली आदी गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे बॅनर लावत शांततेत साखळी उपोषण सुरू आहे.
मांजरम येथे लहान मुले शाळेच्या गणवेशात साखळी उपोषणात सहभागी होऊन शैक्षणिक आरक्षण गरजेच आहे, तरच आमचे भविष्य उज्वल होईल, अशा भावना व्यक्त करतात. कोलंबी येथे बौद्ध समाज बांधवातील सरपंच प्रतिनिधी शिवाजी लांडगे व सामाजिक कार्यकर्ता सुनील लांडगे यांच्यासह राजपूत, गवळी, गवंडी, मुस्लिम, कोष्टी आदी समाजातील बांधवानी उपोषणस्थळी भेट देऊन मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठींबा दिला आहे.

Back to top button