

कुरकुंभ/पांढरेवाडी: कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील त्रिमूर्ती फार्मा कंपनीत गुरुवारी (दि. २६) घडलेल्या स्फोटसदृश घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा यंत्रणा अखेर खडबडून जागी झाली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने कंपनीतील सॉल्व्हेंट डिस्टिलेशन प्रक्रिया तत्काळ बंद ठेवण्याचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
रिअॅक्टरला सेफ्टी व्हॉल्व्ह आणि रप्चर डिस्क बसविण्यासह विविध सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कंपनीच्या संबंधित उत्पादन प्रक्रियेला सुरक्षा उपाय पूर्ण होईपर्यंत ब्रेक लागणार आहे. कुरकुंभ एमआयडीसी येथील त्रिमूर्ती फार्मा कारखान्यात गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास एन-ब्युटानॉल डिस्टिलेशन प्रक्रियेदरम्यान तापमान आणि दाब वाढल्याने रिअॅक्टरला जोडलेला व्ह्यू ग्लास फुटल्याची घटना घडली होती.
या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसली, तरी औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. सहसंचालक सुधीर शिंदे आणि सहाय्यक संचालक विष्णू सांगोलकर यांनी २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी सलग दोन दिवस कारखान्याची आपत्कालीन तपासणी केली.
या तपासणीदरम्यान आढळलेल्या बाबींच्या अनुषंगाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामकाजाच्या अटी संहिता, २०२० मधील कलम ३८ (१-अ) (अ) अन्वये सॉल्व्हेंट डिस्टिलेशन प्रक्रिया बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षा उपायांशिवाय प्रक्रिया सुरू करता येणार नाही, संचालनालयाने कारखाना व्यवस्थापनाला सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या उपाययोजना बंधनकारक केल्या आहेत.
त्यामध्ये रिअॅक्टरला सेफ्टी व्हॉल्व्ह आणि रप्चर डिस्क बसविणे, रिअॅक्टर व प्रेशर व्हेसलची हायड्रॉलिक टेस्टिंग करणे, तज्ज्ञांमार्फत HAZOP अभ्यास करून त्यातील शिफारशींची अंमलबजावणी करणे तसेच अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी दूर करणे यांचा समावेश आहे. या उपाययोजनांची पूर्तता करून संबंधित सुरक्षा निकषांचे पालन करणे कंपनी व्यवस्थापनासाठी आवश्यक ठरणार आहे. दरम्यान, कारखाना व्यवस्थापनाविरुद्ध संबंधित कायदेशीर तरतुदी आणि नियमांनुसार पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.