

शिक्रापूर: कोरेगाव भीमानजीक पेरणे फाटा येथील जयस्तंभाला शौर्यदिनी अभिवादन करण्यासाठी गुरुवारी (दि. 1) राज्याच्या कानाकोपऱ्यांसह देशभरातून लाखोंचा भीमसागर उसळला होता. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, संविधानाची प्रतिमा व निळे झेंडे घेत भीम अनुयायींचे जथ्थेच्या जथ्थे अभिवादनस्थळावर धडकत होते. ‘जय भीम’च्या नाऱ्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे शौर्य दिन मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पडला.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील जयस्तंभ येथे 1 जानेवारीच्या मध्यरात्री 12 वाजून 1 मिनिटाने फटाके फोडून, विद्युतरोषणाईच्या वातावरणात 208 व्या शौर्य दिनास जल्लोषात सुरुवात झाली. या वेळी जयस्तंभ फुलांसह आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता. या जयस्तंभावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अशोकचक्र व संविधानाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. कडाक्याची थंडी असताना देखील रात्रीपासूनच भीमसैनिकांनी गर्दी केली, तर मानवंदना देण्यासाठी नागरिकांना रांगेत सोडण्यात येत होते. भरदुपारच्या उन्हात देखील भीमसैनिक आणि नागरिक जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी रांगेत उभे होते.
राज्य शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच जयस्तंभाला अभिवादन केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे जोगेंद्र कवाडे, बामसेफचे वामन मेश्राम, भीमराज आंबेडकर, आमदार ज्ञानेश्वर कटके, बापूसाहेब पठारे, माजी आमदार प्रकाश गजभिये आदींसह अनेकांनी अभिवादन केले. कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक सुनील फुलारी, पुणे ग््राामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटिल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सर्जेराव कुंभार, प्रमोद क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले.
पोलिसांनी अभिवादनस्थळावर जाण्यासाठी स्वतंत्र व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र रांगा करूनही मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने व्हीआयपी गेटमधून देखील अनुयायांना सोडण्यात आले होते. येथे आलेल्या तरुण कार्यकर्त्यांसह नागरिकांची लक्षणीय गर्दी झाली असताना अंदाजे 15 लाख भीमसैनिक अभिवादनासाठी या ठिकाणी आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यावर्षी देखील महार रेजिमेंटच्या निवृत्त जवानांच्या वतीने दिलेली मानवंदना विशेष आकर्षण ठरली.
पोलिस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त
सन 2018 चा कटू अनुभव लक्षात घेता पोलिस प्रशासनाने या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. 7 अतिरिक्त पोलिस अधीक्षक, 27 उपविभागीय पोलिस अधिकारी, 67 पोलिस निरीक्षक, 283 सहाय्यक पोलिस निरीक्षक व फौजदार, 3 हजार 283 पोलिस कर्मचारी, एसआरपीएफच्या 12 प्लॅटून, 500 स्वयंसेवक, 8 बॉम्बशोधक पथके, 172 सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोन कॅमेरे असा तगडा बंदोबस्त पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता.