

पुणे: पुणेकरांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात भक्तिभावाने केल्याचे पाहायला मिळाले. वर्षाचा पहिला दिवस शुभेच्छा, आनंद आणि संकल्पांसोबतच देवदर्शनाने सुरू व्हावा, या भावनेतून शहरातील विविध धार्मिक स्थळांवर भाविकांनी पहाटेपासूनच हजेरी लावली. दगडूशेठ हलवाई गणपती, सारसबाग येथील गणपती मंदिर, महालक्ष्मी मंदिर, पर्वती देवस्थान, मृत्यूंजयेश्वर मंदिर, पाताळेश्वर, दशभूजा गणपती मंदिर, इस्कॉन मंदिर यांसह शहरातील आणि उपनगरांतील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटेच्या आरतीपासूनच रांगा लागल्या होत्या. नव्या वर्षात सुख, समाधान, आरोग्य आणि यश लाभावे, यासाठी भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. मंदिर ट्रस्टकडून गर्दीचे नियोजन, सुरळीत दर्शनासाठी स्वतंत्र रांगा आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली होती.
सारसबाग येथील गणपती मंदिरातही कुटुंबांसह आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी शांततेत दर्शन घेत नव्या वर्षाचे स्वागत केले. महालक्ष्मी मंदिरातही सकाळपासूनच भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. काही भाविकांनी नवसपूर्ती, अभिषेक, आरतीत सहभाग घेतला.
नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेकांनी उपवास, विशेष पूजा, तसेच दानधर्म करण्यावर भर दिला. मंदिर परिसरात फुलविक्रेते, पूजेच्या साहित्याची दुकाने गजबजलेली दिसून आली. एकीकडे नववर्षाचे जल्लोष, पर्यटनस्थळांवरील गर्दी सुरू असतानाच, दुसरीकडे पुणेकरांनी देवदर्शनातून वर्षाची सकारात्मक आणि शांत सुरुवात केल्याचे चित्र शहरात दिसून आले.
संध्याकाळी वाहतूक कोंडी
गुरुवारी संध्याकाळी बहुतांश पुणेकर शहराच्या विविध भागांमध्ये देवदर्शनासाठी बाहेर पडले. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता अशा विविध ठिकाणी संध्याकाळी वाहतूक कोंडी झाली होती.