

राजगुरुनगर: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमध्ये नवीन हंगामातील कांदा व बटाटा खरेदी-विक्री व्यवहाराचा शुभारंभ सभापती ॲड. विजयसिंह शिंदे पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 1) पार पडला.
राजगुरुनगर बाजार आवारात कांदा व बटाटा खरेदी-विक्रीचे हे दुसरे वर्ष असून, शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला असल्याचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी सांगितले. या वेळी उपसभापती क्रांतीताई सोमवंशी, संचालक अशोक राक्षे, जयसिंग भोगाडे यांच्यासह इतर संचालक, शेतकरी, आडते, हमाल, मापाडी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲड. विजयसिंह शिंदे पाटील यांनी खेड, आंबेगाव, शिरूर व मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला कांदा व बटाटा शेतमाल मोठ्या प्रमाणात राजगुरुनगर यार्डमध्ये विक्रीसाठी आणण्याचे आवाहन या वेळी केले. या बाजाराची वैशिष्ट्ये म्हणजे उघड्या पद्धतीने लिलाव, त्वरित वजनमाप, संगणकीकृत काटापट्टी तसेच शेतकऱ्यांना ’एसएमएस’द्वारे मालविक्रीचे वजनमाप व डिजिटल काटापट्टीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
राजगुरुनगर बाजार आवारात हा बाजार मंगळवार, गुरुवार व रविवार असे तीन दिवस भरणार असून, शेतकऱ्यांसाठी समितीच्या वतीने आवारातच अल्पदरात भोजनाची सोय करण्यात आली आहे.
हंगामाच्या पहिल्याच दिवशी कांद्याची 1 हजार 50 पिशव्यांची आवक झाली. त्याला 1 हजार 200 ते 2 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल असा चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. गतवर्षी एकूण 14 हजार 121 क्विंटल शेतमालाची आवक होऊन 2 कोटी 21 लाख 27 हजार 515 रुपयांची उलाढाल झाली होती. कार्यक्रमाच्या शेवटी बाबूराव सांडभोर यांनी उपस्थितांचे आभार मानले.