

निनाद देशमुख
पुणे : समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या टाक्यांच्या जलवाहिनी टाकण्याचे काम रखडले आहे. या कामाला 2023 मध्ये मुदतवाढ देऊनही अद्याप ही कामे पूर्ण झालेली नाहीत. तसेच पाणीमीटर बसवण्याचे काम देखील अपूर्ण राहिले आहे. 80 हजार मीटर बसविणे बाकी असल्याचे समोर आले आहे.
शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेमध्ये असणारी 40 टक्के गळती थांबवण्यासाठी आणि नागरिकांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. ही योजना पुढील 30 वर्षांचा विचार करून आणि शहराची संभाव्य 49 लाख 21 हजार 663 लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली. या योजनेला महापालिकेच्या मुख्य सभेने मे 2015 मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर 2 हजार 435 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या.
योजनेसाठी नेमलेल्या प्रकल्प सल्लागाराने दिलेल्या आराखड्यानुसार शहरात विविध ठिकाणी 82 पाणी साठवण टाक्या, पाणी वितरणासाठी 1268.97 कि.मी. लांबीच्या जलवाहिन्या, 101.54 कि.मी. लांबीच्या पाणीसाठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि 2 लाख 39 हजार पाणीमीटर बसवणे, नागरी सुविधा केंद्र 7 आणि 6 नवीन पंपिंग स्टेशन आदी कामे केली जात आहेत. ही कामे 36 महिन्यांत पूर्ण करण्याचे निविदेमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र, या कामाला आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली असतानाही जलवाहिन्या टाकण्याची कामे आणि मीटर बसवण्याची कामे रखडली आहेत.
पाणीमीटर बसवण्यास नागरिक व राजकीय मंडळींकडून विरोध होतो. त्यामुळे पाणीमीटर बसवण्याचे काम रखडले आहे, तर बसवलेले मीटर राजकीय आश्रयाखाली फोडले जात आहे. मीटर बसवण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग व अतिरिक्त आयुक्तांनी पाणीमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यांची नळजोडणी तोडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. उर्वरित पाणीमीटर एका महिन्यात बसवून हे काम पूर्ण करण्याचे जाहीर केले होते. मात्र, मीटर बसवण्याचे काम हे संथगतीने सुरू आहे. विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास मनपाचे अधिकारी धजावत नाहीत. अद्याप 42 हजार पाणीमीटर बसवणे बाकी असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. काही महिन्यांत महापालिकेची निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पाणीमीटर बसवले, तर मतदारांचा रोष ओढवू शकतो, विरोध होऊ शकतो. त्यामुळे मीटर बसवण्याचे काम नेमके केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
समान पाणीपुरवठा योजनेचे काम फेबुवारी 2018 मध्ये सुरू झाले. फेबुवारी 2023 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. यासाठी 2018 पासून दरवर्षी पाणीपट्टीत 15 टक्के वाढ करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 1 हजार 656 कि.मी. नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार होती. मात्र, यात कपात करून 1300 कि.मी. जलवाहिन्या टाकण्याचे ठरवले, तर 3, 18,564 पाणीमीटर घराघरात बसवणार होते. ते उद्दिष्ट 2,39,673 मीटरवर आणण्यात आले. 82 नवीन टाक्या बांधणार होते ते उद्दिष्ट 67 टाक्यांवर आणण्यात आले. एवढा उशीर होऊनही ठेकेदाराला मोजकाच दंड ठोठावण्यात आला आहे.
समान पाणीपुरवठा योजनेने काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यासाठी ठेकेदाराला प्रतिदिन 2 कोटी रुपये दंड आकारण्याची गरज आहे, तरच हे काम वेळेत पूर्ण होईल.
विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे