

पारगाव : केळीला सध्या अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. रांजणी परिसरात अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या खोडवा केळीवर चक्क शेळ्या-मेंढ्या ताव मारताना दिसत आहेत.
आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग हा बागायती स्वरूपाचा असून, गेल्या चार-पाच वर्षांत अनेक शेतकरी केळी पिकाकडे वळले होते. मागील काळात केळी पिकातून चांगले उत्पन्न मिळाले होते. मात्र, यंदा केळीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत.
रांजणी, नागापूर व पारगाव परिसरात यावर्षी थंडीचे प्रमाण अधिक होते. परिणामी केळी पिकावर ’चिलिंग’चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे केळीची निर्यात वेळेत होऊ शकली नाही. बागांमधील केळी वेळेआधीच परिपक्व झाल्याने स्थानिक व्यापारी चार ते आठ रुपये किलो दराने केळीची खरेदी करत आहेत. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही.
सुरू हंगामातील केळीला देखील समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही. खोडवा केळीच्या पिकालाही अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक बागांमध्ये केळीचे घड परिपक्व होऊन खराब होत आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी केळीचे घड मेंढपाळांना शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी दिले आहेत. परिपक्व हिरव्या केळीवर शेळ्या-मेंढ्या ताव मारताना दिसत आहेत.