

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा वारू रोखण्यासासाठी महाविकास आघाडीसह अजित पवार गटाच्या बैठका सुरू आहे. या बैठका सुरू असताना मुंबईतील कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला बरोबर घेण्यास विरोध केला आहे. त्यामुळे आता अजित पवार गट वगळून समविचारी पक्षांना बरोबर घेत महाविकास आघाडी होण्याच्या शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे असताना महापालिकेच्या रणधुमाळीत तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्याने आता प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. या निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. भाजपने तब्बल 125 जागा निवडून आणण्याची तयारी केली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत सुरू आहे. त्यात पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आहे. याबाबतही बैठका सुरू आहेत. महायुतीत भाजप, शिंदे शिवसेना व आरपीआय एकत्र लढणार आहे. तर मविआत दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे व कॉंग्रेस एकत्र लढण्याच्या चर्चा सुरू होत्या. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येत मनसेलाही सोबत घेत महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. याबाबत बुधवारी पुण्यतील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. भाजपच्या विरोधात प्रत्येक जागेला एक उमेदवार दिला जाणार तसेच जागा वाटपाच्या प्रस्तावावरही या बैठकीत चर्चा सुरू होत्या. मात्र, मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार गटाबरोबर महाविकास आघाडी न करण्याचे व समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याचे आदेश प्रदेश काँग्रेसने दिले आहेत. त्यानंतर मविआतून आता अजित पवार गटाचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे पुण्यात महायुती, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. जर कॉंग्रेसने मनसेसोबत जाण्यास नकार दिला तर चौरंगी लढत देखील होण्याची शक्यता आहे. या चौरंगी अथवा तिरंगी लढतीत देखील महायुती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता आहे.
2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना पक्षात फुट पडली नव्हती. भाजपने या निवडणुकीत 98 जागा जिंकल्या होत्या तर पोट निवडणुकीत एक जागा जिंकली होती. त्यामुळे त्यांच्या नगरसेवकांचा आकडा हा 99 झाला होता. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 41 उमेदवार निवडून आले होते. राष्ट्रवादीने देखील पोटनिवडणुकीत एक जागा जिंकली होती. त्यामुळे त्यांच्या विजयी उमेदवारांची संख्या ही 42 होती. कॉंग्रेसला या निवडणुकीत 11 तर शिवसेनेला 10 व मनसेला 2 जागा मिळाल्या होत्या. मात्र, गेल्या तीन ते साडेतीन वर्षात राजकारणाची गणितं बदलली आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेत फूट पडून दोन पक्ष वेगवेळी झाली आहेत.
या निवडणुकीत भाजपने महायुतीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रमुख विरोधक मानले आहे. त्यामुळे आता अजित पवार व शरद पवार गट एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीत अजित पवार गटासोबत लढण्यास कॉंग्रेसने नकार दिल्याने आता दोन्ही राष्ट्रवादीला स्वतंत्र लढावे लागणार आहे. त्यामुळे महायुती, दोन्ही राष्ट्रवादी व महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जात आहे. जर यातही फुट पडली तर चौरंगी लढत होण्याची देखील शक्यता आहे.
पक्षश्रेष्ठींचा निरोप आला आहे, पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी युती करू नका. शिवसेना (उबाठा) आणि इतर कोणी येत असेल तर चर्चा करा. मात्र अजित पवारांशी युती करू नका. त्यामुळे समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुणे महापालिकेची निवडणूक लढवणार आहोत.
अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस
काँग्रेसने निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता निवडणूक स्वबळावर लढायची की महाविकास आघाडीतून यावर चर्चा करण्यासाठी पक्षाची बैठक शुक्रवार, 26 डिसेंबरला होईल. या बैठकीत पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांचेही म्हणने ऐकून घेतले जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल.
अंकुश काकडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष.