

पौड : पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीच्या उगमस्थानाजवळ, वेगरे-मांडवखडक (ता. मुळशी) येथे ऐतिहासिक, प्रसिद्ध व जागृत देवस्थान कोंडजाई देवीचे ठाणे आहे. दाट जंगलातून पायवाट शोधत जाऊन थोडे अंतर पायी चालल्यावर कोंडजाईची राई दिसते.(Latest Pune News)
येथील रांजणखळगे पाहण्यासारखे आहेत. विशेष म्हणजे, कोरडा दुष्काळ पडला तरी कोंडजाईच्या पाण्याची पातळी कधीही कमी होत नाही. स्थानिक म्हणतात, या कोंडीतील पाण्याच्या खोलीचा आजपर्यंत कोणीही अचूक अंदाज लावलेला नाही.
कोंडजाई मंदिर हे मुठा नदीच्या मूळ सौंदर्याचे दर्शन घडविते. काही वर्षांपूर्वी, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत इंगळहळीकर यांनी उगमस्थानावर गोमुख बसविले आहे. येथील वार्षिक जत्रे तुटगाव वेगरे महालातील मरगळे परिवाराची परंपरा जपते. पूर्वी चालत आलेली ही जत्रा आजही चालू आहे. अनेक भाविक वर्षातून एकदा तरी देवीच्या दर्शनाला येतात.
वेगरेतील कोंडजाई देवीची बहीण कोकणातील नागशेत (ता. सुधागड, जि. रायगड) येथे कुंडलिका नदीच्या काठावर वसलेली आहे. ही देवी ठाकरे परिवाराचे दैवत आहे. दिवंगत हिंदुहृदयसमाट बाळासाहेब ठाकरे येथे नियमित दर्शनाला येत असत. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे दसऱ्याच्या वेळी येथे येतात.
दोन्ही ठिकाणच्या साम्याचा पैलू म्हणजे पाण्याची कोंड आणि रांजणखळगे. येथे पाणी हंड्यानेच घेणे योग्य असते; विद्युत मोटर लावली तरी ती तत्काळ बंद पडते, असे स्थानिक सांगतात.
वेगरे-मांडवखडक येथील कोंडजाई आणि मुठा नदीतील खडकात
असलेले कोंडजाईचे मूळ रूप.
खडकवासला प्रकल्पातील पाणी पुणेकर पितात. त्या खडकवासला व टेमघर या जलाशयांना देणारा आशीर्वाद मूळ रूपात वेगरे-मांडवखडक येथे पाहायला मिळतो. कोंडजाई आणि मुठा ही पुणेकरांच्या जीवनदायिनी आहेत. मुठेचे मूळ रूप स्वच्छ व सुंदर आहे; ते पाहून नदी जपण्याची प्रेरणा घ्यायला हवी.
भाऊसाहेब मरगळे, माजी सरपंच