

देहूगाव : आरोग्यदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका गेल्या सहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. केंद्र शासनाचा जून 2025 पासून आणि राज्य शासनाचा जुलै 2025 पासूनचा पगार अद्याप मिळालेला नाही. परिणामी हजारो कुटुंबांपुढे अन्न, शिक्षण आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.(Latest Pune News)
..या आहेत मागण्या
22 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडे निवेदन देण्यात आले होते. यामध्ये आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा, दरमहा 10 तारखेपूर्वी मानधन अदा करावे, पंतप्रधान मातृवंदना योजनेचे थकीत मानधन त्वरित द्यावे, दिवाळी सानुग्रह निधी पाच हजार रुपये द्यावा, कायमस्वरूपी नियुक्ती आदेश द्यावेत आदी मागण्या करण्यात आल्या होत्या, अशी माहिती संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील आणि सरचिटणीस भगवान दवणे यांनी दिली.
सेवा चालू पण वेतन ठप्प
दररोज घराघरो जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या, गर्भवती महिलांची काळजी घेणाऱ्या आणि संसर्गजन्य रोगांबाबत जनजागृती करणाऱ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आरोग्याच्या पायाभूत सेवेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे वेतन सातत्याने रखडत असल्याने अनेक जणींनी कर्ज काढून घर चालवावे लागत असल्याचे समोर आले आहे.
राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला असून, जुलै महिन्याचा पगार आठ दिवसांत जमा होणार आहे. उर्वरित दोन-तीन महिन्यांचे मानधन दिवाळीपूर्वी दिले जाईल.
मनीषा शिंदे, तालुका समूह संघटिका
केंद्र शासनाच्या नव्या प्रणालीमुळे प्रक्रिया काहीशी रखडली असल्याचे सांगितले जात आहे. नवीन यंत्रणेनुसार यादी तयार करुन खात्याच्या तपशीलांसह माहिती भरावी लागणार आहे. त्यामुळे केंद्राचा निधी कधी मिळेल, हे निश्चित सांगता येत नाही. आज सहा महिन्यांपासून आम्हाला पगार मिळत नाही. त्यामुळे घर चालविणेही अवघड झाले आहे.
एक आशा स्वयंसेविका
ज्या आशा स्वयंसेविका, गटवर्तक महिलांनी कोरोना काळातही जीवाची पर्वा न करता सेवा दिली. रात्रं-दिवस सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम केले. नागरिकांच्या आरोग्याची विचारपूस करून अहवाल तयार करणे, नोंदवही अद्यावत करणे, लसीकरण, डेंग्य, मलेरिया आदीबाबत कामे करावी लागतात.चार-पाच महिने झाले तरी शासनाने पगार दिलेला नाही. इतर काही मोबदला असतो तो दिला नाही. त्यामुळे आमच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाने त्वरित आमचे पगार द्यावेत.
एक आशा स्वयंसेविका